मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – शिवडीतील हसीना अब्दुल माजिद सय्यद या 42 वर्षांच्या महिलेच्या हत्येचा पर्दाफाश रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर पळून जाणार्या चंदन मिश्रा याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मद्यप्राशन करताना झालेल्या क्षुल्लक वादातून हसीनाने चंदनला मारहाण केली होती, त्याच्याच रागातून त्याने हसीनाची चाकूने भोसकून हत्या केल्याचे आतापर्यंत पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हत्येमागील हेच कारण आहे की अन्य कारणामुळे ही हत्या झाली याचाही पोलीस तपास करत आहेत.
हसीना ही मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासू शिवडी परिसरात राहत होती. तिचे अक्रम डफालीसोबत लग्न झाले होते, मात्र पतीसोबत होणार्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. पतीला सोडल्यानंतर ती देवीचंद हिरालालजी जैन या 60 वर्षांच्या व्यक्तीसोबत त्याच्याच शिवडीतील जय हनुमान फिटनेस सेंटरजवळील बीडीडी इमारत क्रमांक नऊसमोरील फ्लॅटमध्ये राहत होती. हसीनाला गेल्या तीन वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु प्यायल्यानंतर तिला कुठलेही भान राहत नव्हते. बुधवारी 4 जूनला तो रात्री जेवण आणण्यासाठी बाहेर गेला होता.
रात्री साडेअकरा वाजता घरी आल्यानंतर त्याला हसीना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसून आली. त्यामुळे तिच्या भावासह देवीचंदने तिला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन तिची हत्या केली होती. त्यामुळे रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना हत्येनंतर पळून गेलेल्या चंदन मिश्रा या 47 वर्षांच्या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले. हत्येच्या वेळेस हसीना ही घरी मद्यप्राशन करत होती. यावेळी चंदन तिथे आला होता. या दोघांची तोंडओळख होती. ते दोघेही मद्यप्राशन करत होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून चंदनला हसीनाने मारहाण केली होती. त्याचा राग आल्याने त्याने तिक्ष्ण हत्याराने तिची वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर तो तेथून पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.