मुलुंड येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश
कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची सुरु होती फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मुलुंड येथे सुरु असलेल्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कर्जाच्या आमिषाने ही टोळी अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर राजेश गुप्ता, अभिषेक सूर्यप्रकाश सिग, तन्मयकुमार रजनीश दादसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन मोहम्मद अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने कर्जाच्या आमिषाने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना मुलुंड येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलुंडच्या मुलुंड कॉलनीत काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची कर्जाच्या आमिषाने फसवणुक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली होती. ही माहिती पोलीस उपायुक्त राकेश ओला यांना दिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासह मुलुंड पोलिसांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल करांडे, मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद आपुणे, पोलीस हवालदार उरणकर, पोलीस शिपाई आव्हाड, विंचू, कट्टे, ढेबे, बनसोडे, पवार यांनी संबंधित कॉल सेंटरची माहिती काढण्यास सुरुवात केली होती.
ही माहिती काढताना या पथकाने मंगळवारी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकलाद होता. यावेळी तिथे सागर गुप्ता हा त्याच्या इतर चार सहकार्यांसोबत उपस्थित होता. या फ्लॅटमध्ये त्याने एक बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केल्याचे दिसून आले. लेंडीग पाईट या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून, त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय ई-सिमकार्डचा वापर करुन सागर गुप्तासह इतर चौघेजण अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना कॉल करत होते. तयांना पे डे तत्त्वावर तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून नव्वद, शंभर आणि दिडशे डॉलर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. मात्र ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर होताच त्यांना कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती.
या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल, दोन राऊटर, 76 हजाराची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कर्ज मंजुरीचे काही कागदपत्रे सापडले असून या कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक विदेशी नागरिकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कर्ज प्रकरणात एकच अॅप्लिकेशन क्रमांक सापडला आहे.
या टोळीचा सागर गुप्ता असून त्याच्याकडे इतर चौघेही कामाला होते. सागरने कॉल सेंटर चालविणयासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवानगी घेतली नव्ती. तो त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवून कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणुक करत होता. त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घेऊन या पैशांचा अपहार करत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले जात होते.
हा प्रकार उघडकीस येताच या पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, आयटी, टेलिकॅम्युनिकेशन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर पाचही आरोपींना बुधवारी दुपारी मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.