शेअरसाठी घेतलेल्या 36 लाखांचा अपहार करुन फसवणुक

फसणुकीच्या गुन्ह्यांत बंगलोरच्या व्यावसायिकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अनलिस्टेड शेअर विक्री करण्याची बतावणी करुन शेअरसाठी घेतलेल्या सुमारे 36 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी बंगलोरच्या एका व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. रजत अमरचंद्र जैन असे या 39 वर्षीय आरोपी व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. अनलिस्टेड शेअरसाठी रजत जैनने एका खाजगी कंपनीकडून 95 लाख रुपये घेतले, त्यापैकी 59 लाख रुपये परत करुन उर्वरित 36 लाखांचा अपहार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच काही तासांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती.

केयुर सुरेशभाई शाह हे बोरिवलीतील रहिवाशी असून ते शेअरमार्केटमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. बॉण्ड रुम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक परेश शाह यांच्या कंपनीसाठी ते शेअरमार्केटमधून शेअर खरेदी-विक्रीचे काम पाहतात. मे 2025 रोजी कंपनीला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अनलिस्टेड शेअर खरेदी करायचे होते. याबाबत परेश शाह यांनी केयुर शाह यांना विचारणा करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांच्या परिचित व्यक्तीने त्यांना रजत जैनविषयी माहिती दिी होती. त्यामुळे त्यांनी रजतला संपर्क साधून सांधून त्याच्याकडे अनलिस्टेड शेअरबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने त्याच्याकडे एनएसईचे दहा शेअर उपलब्ध असून त्याला प्रति शेअर 1900 रुपयांना विक्री करायचे असल्याचे सांगितले होते.

शेअरची ही किंमत ठिक वाटल्याने त्यांनी त्याच्याकडून पाच हजार अनलिस्टेड शेअर खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या मेलवरुन त्याच्याकडे शेअर खरेदी-विक्रीबाबत एक मेल पाठविला होता. 1900 प्रमाणे पाच हजार शेअरचे 95 लाख रुपये होणार होते. त्यामुळे त्याने मेलवर त्यांना होकार असल्याचा रिप्लाय पाठविला होता. ठरल्याप्रमाणे केयुर शाह यांच्या सांगण्यावरुन कंपनीने रजतच्या बँक खात्यात टिडीएस कट करुन 94 लाख 95 हजार 500 रुपये ट्रान्स्फर केले होते. त्याला पैसे पाठविल्याचे युटीआर क्रमांक पाठविला होता,

मात्र रजतने त्याला पैसे मिळाले नसल्याचे सांगून शेअर ट्रान्स्फर करण्यास नकार दिला होता. ऑनलाईन पैसे पाठविल्याचे पुरावे असताना रजतने पैसे मिळाले नसल्याचा दावा करुन कंपनीची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे केयुर शाह हे त्यांचे सहकारी निलेश रमेशचंद्र शाह यांच्यासोबत त्याच्या बंगलोर येथील घरी गेले होते. मात्र तो घरी सापडला नाही. फोनवरुन संपर्क साधल्यानंतर त्याने त्यांना हॉटैल रॅडीसनमध्ये बोलाविले होते. तिथे त्यांची भेट झाली होती. यावेळी केयुर शाह यांनी त्याच्या खात्यात पैसे पाठविल्याचे पुरावे सादर केले.

शेअर ट्रान्स्फर करण्याची किंवा पैसे परत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने त्यांना 54 लाख रुपये ट्रान्स्फर केले तर उर्वरित रक्कम जून महिन्यांत ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते. 2 जूनला त्याने आणखीन पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले, मात्र उर्वरित 36 लाख रुपये परत केले नाही. वारंवार विनंती करुनही त्याने पैसे ट्रान्स्फर केले नाही. पैशांसाठी घरी आलात तर त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार करण्याची त्याने त्यांना धमकी दिली होती. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच बॉण्ड रुम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने केयुर शाह यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा रजत जैनविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत रजत जैनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page