गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमध्ये चोरी करणारा गजाआड

आरोपीविरुद्ध दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांचे विशेषता महिलांच्या पर्समधील दागिने पळविणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुरेश बाबू पवार असे या 50 वर्षीय आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अशाच दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे एक लाखांचे दागिने हस्तगत करणयात आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

गुलअफशा शफीक शेख ही महिला कांदिवलीतील लक्ष्मीनगर, करीम चाळीत राहते. 9 नोव्हेंबरला दुपारी बारा ते दिडच्या सुमारास ती गोरेगावहून महिंद्रा कंपनी गेट ते विक्रोळी डेपोदरम्यान धावणार्‍या बेस्ट बसमधून प्रवास करत होती. यावेळी तिच्या पर्समधून अज्ञात व्यक्तीने दोन मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि कॅश असा सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात येताच तिने समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर, पोलीस हवालदार किरणी, निजाई, पोलीस शिपाई जाधव, शिंदे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मालाड येथून सुरेश पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन्ही मंगळसूत्र, चांदीचे दागिने असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात सुरेश हा मालाडच्या कुरार व्हिलेज, अप्पापाडा, सावित्रीबाई फुले नगरात राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमध्ये प्रवासादरम्यान चोरी करुन पलायन करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page