1.36 कोटीच्या स्पेअरपार्टच्या अपहार करुन कंपनीची फसवणुक

दोन अधिकार्‍यांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – आपल्या पदाचा गैरवापर करुन एका खाजगी कंपनीच्या सुमारे 1 कोटी 36 लाख रुपयांच्या स्पेअरपार्टचा दोन कर्मचार्‍यांनी अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन अधिकार्‍याविरुद्ध गोवंडी पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उत्कर्ष श्यामलाल विश्वकर्मा आणि मयुर रमेश कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. यातील उत्कर्ष आणि मयुर हे दोघेही आयशार फोर्ट पॉईट ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनुक्रमे स्पेअरपार्ट मॅनेजर आणि सहाय्यक स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विजय शंकर पालकर हे गोवंडी परिसरात राहत असून सध्या गोवंडीतील आयशार फोर्ट पॉईट ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वर्कशॉप मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे मुंबईसह महाराष्ट्र तीन वेगवेगळे वर्कशॉप असून त्यातील गोवंडीतील वर्कशॉपमध्ये विजय पालकर हे 2019 पासून कामाला आहेत. पूर्वी कंपनीचे वर्कशॉप वाकोला येथे होते, मात्र जानेवारी 2024 रोजी ते युनिट बंद करुन मार्च 2025 रोजी गोवंडी येथे नवीन युनिट सुरु करण्यात आले होते. तिथे एकूण 42 कर्मचारी कामाला असून त्यात उत्कर्ष विश्वकर्मा हा तिन्ही वर्कशॉपमध्ये स्टोअर मॅनेजर तर मयुर कांबळे हा त्याचा सहाय्यक मॅनेजर म्हणून काम पाहत होते. या दोघांकडे तिन्ही वर्कशॉपची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

उत्कर्ष हा कंपनीत वरिष्ठ पदावर कामाला असल्याने त्याच्यावर तिन्ही वर्कशॉपच्या स्टोअरमधील उपलब्ध स्पेअरपार्टची खरेदी-विक्रीचा अधिकार होता. त्यासाठी कंपनीने त्याला एसआरपी अ‍ॅपमध्ये त्याच्या नावाने स्वतंत्र लॉगिंन आयडी आणि पासवर्ड दिले होते. या स्पेअरपार्टच्या हिशोबाची जबाबदारी मयुर कांबळे याच्याकडे होती. ऑगस्ट 2023 नंतर तिन्ही वर्कशॉपच्या स्पेअर पार्टच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे ऑडिट झाले नव्हते. त्यामुळे कंपनीने ऑक्टोंबर 2025 रोजी तिन्ही वर्कशॉपचे ऑडिट केले होते. त्यासाठी आरिफ जमीन खान यांना मॅनेजमेंटने सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट 2023 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत कंपनीत एकूण आलेले आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या स्पेअरपार्टचे ऑडिट केले होते. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते.

वर्कशॉपमधून कोट्यवधी रुपयांचे स्पेअरपार्ट बाहेर पाठविण्यात आले होते. त्याची उत्कर्ष विश्वकर्मा याने त्याच्या लॉगिंगमध्ये नोंद केली होती, मात्र नंतर काही नोंद डिलीट करण्यात आले होते. प्राथमिक तपासात उत्कर्षसह मयुर कांबळे यांनी संगनमत करुन कोट्यवधी रुपयांचा स्पेअर पार्टचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच या दोघांची आरिफ खान यांनी चौकशी केलीह ोती. यावेळी या दोघांनीही ऑगस्ट 2023 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत 1 कोटी 36 लाख 71 हजार 126 रुपयांच्या स्पेअरपार्टचा अपहार केल्याची कबुली दिली होती. मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

हा अहवाल नंतर कंपनीच्या मालकांना देण्यात आला होता. त्याची कंपनीच्या मालकांनी गंभीर दखल घेत विजय पालकर यांना कंपनीच्या वतीने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उत्कर्ष विश्वकर्मा आणि मयुर कांबळे यांच्याविरुद्ध कंपनीच्या स्पेअरपार्टचा अपहार करुन लॉगिंग अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page