मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे पावणेदोन कोटीचे सोने घेऊन एका कारागिराने पलायन केल्याची घटना पायधुनी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनंत सिंधा या आरोपी कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने एक टिम त्याच्या गावी पाठविण्यात येणार आहे.
खोकन राखाहरी रॉय हे ज्वेलर्स व्यापारी असून ते भाईंदर परिसरात राहतात. त्यांचा पायधुनीतील अब्दुल रेहमान स्ट्रिट, ननजी मंजिल इमारतीच्या तिसर्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. याच ठिकाणी काही कारागिर सोन्याचे दागिने बनवितात. त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. अनंत सिंधा हा परिचित कारागिर असून अनेकदा ते त्याच्याकडून विविध सोन्याचे दागिने बनवून घेत होते. जुलै ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्यांनी अनंतला 24 कॅरेटचे 1 कोटी 76 लाख रुपयांचे 2265 ग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्याने त्यांना एक महिन्यांत सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र चार महिने उलटूनही त्याने त्यांना दागिने बनवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागितली होती. काही दिवसांनी तो कारखान्यातून अचानक निघून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अनंतला कॉल केला होता, मात्र त्याचा कॉल बंद येत होता. अनंतने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले पावणेदोन कोटीचे सोने घेऊन पलायन केले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनंतविरुद्ध पोलिसांनी पावणेदोन कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.