पंधरा वर्षांच्या मुलीशी बालविवाह करुन लैगिंक अत्याचार
32 वर्षांच्या आरोपीस पतीला अटक तर तिघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्यापेक्षा वयाने बारा वर्षांनी मोठा असलेल्या पेंटरशी बालविवाह लावून तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 32 वर्षांच्या आरोपी पती असलेल्या पेंटरला मालाड पोलिसांनी अटक केली आहे तर इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात पिडीत मुलीच्या बहिणीसह तिचा पती आणि आजीचा समावेश आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान अटकेनंतर आरोपी पतीला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
15 वर्षांची पिडीत मुलगी मालाड परिसरात राहते. तिच्यासोबत तिची विवाहीत बहिण, तिचा पती आणि आजी राहते. या तिघांनी गेल्या वर्षी तिचे वयाने बारा वर्षांनी मोठा असलेल्या एका व्यक्तीशी बालविवाह लावून दिले होते. तिचा आरोपी पती तिच्या बहिणीचा दिर असून व्यवसायाने पेंटर आहे. त्याची पत्नी पंधरा वर्षांची अल्पवयीन आहे असे माहित असताना त्याने तिच्याशी बालविवाह केला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत त्याच्या घरी निघून गेली होती. जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्याने तिच्याशी अनेकदा जवळीक निर्माण करुन तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.
गेल्या काही दिवसांपासून तिचा पतीकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. या शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यातून तिने स्वतची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या परिचितांना तिने हा प्रकार सांगून पोलिसांत तक्रार करण्याचे ठरविले होते. दोन दिवसांपूर्वी तिने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. तिने तिच्या पतीसह तिची बहिण, तिचा पती आणि आजी अशा चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संंबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पिडीत मुलीच्या बहिणीसह तिच्या पती, आजी आणि बालविवाह करणार्या पतीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.