लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराचा खाजगी अवयव कापला

प्रियकरावर उपचार सुरु; प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराचा त्याच्याच प्रेयसीने खाजगी अवयव कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात घडली. जखमी प्रियकरावर व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी प्रियकराच्या जबानीवरुन आरोपी प्रेयसीविरुद्ध वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झाली नाही. लग्नास सतत विरोध करत असल्याने रागाच्या भरात तिने सदरचे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

25 वर्षांची आरोपी तरुणी सांताक्रुज येथील कालिना, जांभळीपाडा परिसरात राहते. तिचे एका 42 वर्षांच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या सात वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. अनेकदा ती त्याला लग्नाविषयी विचारणा करत होती. मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याशी लग्न करत नव्हता. त्याचा तिच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे गुरुवारी तिने त्याला नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे तो तिच्या घरी गेला होता. यावेळी या दोघांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर तो झोपला होता. गुरुवारी पहाटे झोपेत असताना तिने त्याचा खाजगी अवयव तिक्ष्ण हत्याराने कापला होता.

रक्तबंबाळ अवस्थेत तो स्वतहून व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे उपस्थित डॉक्टरांना ही माहिती दिली. ही माहिती नंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून त्याच्या भावासह वाकोला पोलिसांना देण्यात आली होती. ही माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जखमी प्रियकराची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 25 वर्षांच्या प्रेयसीविरुद्ध गंभीर दुखापतीसह धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली आहे. या जबानीतून प्रियकर हा वारंवार लग्नाचे आमिष दाखवत होता, मात्र तिच्याशी लग्न करत नव्हता. याच रागातून तिने त्याचा खाजगी अवयव कापल्याची कबुली दिली आहे. या जबानीनंतर तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तिच्यावर अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page