संकेतस्थळावर फ्लॅट विक्रीची बोगस जाहिरात देऊन फसवणुक

वॉण्टेड असलेल्या ब्रोकरला फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जानेवारी 2026
मुंबई, – संकेतस्थळावर फ्लॅट खरेदी-विक्रीची बोगस जाहिरात देऊन एका सीएची सुमारे 29 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या ब्रोकरला दहिसर पोलिसांनी अटक केली. दिपक किरीट शहा असे या आरोपी ब्रोकरचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत आदित्य आणि राजेश जैन या दोघांचा सहभाग उघडकीस आल्याने या दोघांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हितेश मनसुखभाई गोंडविलया हे दहिसर येथे राहत असून ते सीए म्हणून काम करतात. ते भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याने त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. यावेळी त्यांना एका संकेतस्थळावर दहिसर येथील रावलपाडा, गावडेनगर एन. एल कृष्णा सोसायटीची फ्लॅट विक्रीची एक जाहिरात दिसली होती. त्यात फ्लॅटची किंमत एक कोटी पाच रुपये नमूद होती. त्यामुळे त्यांनी तिथे असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला होता.

यावेळी आदित्य नावाच्या एका एजंटने त्यांना फ्लॅट पाहण्यासाठी रावलपाड्यातील सोसायटीजवळ बोलाविले होते. त्यामुळे हितेश हे त्यांचे वडिल मनसुखभाई यांच्यासोबत 23 ऑगस्ट 2025 रोजी फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी पुढील व्यवहारास सुरुवात केली होती. याच दरम्यान आदित्यने त्याची दिपक आणि राजेशशी ओळख करुन दिली. राजेश हा फ्लॅटचा मालक असून दिपक हा त्यांचा ब्रोकर असल्याचे सांगितले. यावेळी हितेशने ऐंशी लाखांचे कर्ज काढून उर्वरित रक्कम कॅश स्वरुपात देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी त्यांना 29 लाख 55 हजार रुपये दिले होते.

मात्र फ्लॅट रजिस्ट्रेशनसाठी ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. वेगवेगळे कारण सांगून रजिस्ट्रेशन करण्यासाठी येत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन फ्लॅटच्या मालकाची चौकशी केली होती. यावेळी त्यांना फ्लॅटचा मालक दुसरा असून या तिघांनी त्यांच्या कागदपत्रावरुन स्वतचा फोटो लावून तो फ्लॅट राजेश जैन याच्या मालकीचा असल्याचे भासवून फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच हितेश गोंडविलया यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर दिपक शहा, राजेश जैन आणि आदित्य या तिघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फ्लॅट खरेदी-विक्रीा व्यवहार करुन 29 लाख 55 हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दिपक शहाला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page