अंधेरीतील 1.37 कोटीच्या घरफोडीप्रकरणी आरोपीस अटक

सव्वाकोटीचा मुद्देमाल जप्त तर आरोपीविरुद्ध 14 गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील लोखंडवाला, मॅगनेम टॉवरमधील एका बंगलोमध्ये झालेल्या 1 कोटी 37 लाख रुपयांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांतील एका मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली. मनोज मोहन राठोड असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सव्वाकोटीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ओशिवरा आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात चौदाहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

82 वर्षांची वयोवृद्ध महिला कृष्णाकुमारी बलदेव सिंग ही अंधेरीतील लोखंडवाला, दुसरी क्रॉस रोड, मॅगनम टॉवर इमारतीच्या बंगलो क्रमांक 15 मध्ये राहते. तिचा मोठा मुलगा दिल्लीतील गुडगाव येथे राहतो तर लहान मुलगा अभिमन्यूचा फिल्म आणि टिव्ही प्रोडक्शनचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी ती दिल्लीला तिच्या मुलाकडे गेली होती. मुंबईत आल्यानंतर तिला तिचा मुलगा अभिमन्यू हा नोकरासोबत गोव्याला गेल्याचे समजले. मुंबईत नसताना बंगलोमध्ये तिची सून तिच्या वडिलांसोबत राहत होती. घरात तिच्याशिवाय दोन महिला कामाला असून दिवसभर काम करुन त्या दोघीही बंगलोमध्येच राहतात.

29 डिसेंबरला दुपारी तीन वाजता ती तिच्या सून आणि तिच्या वडिलांसोबत धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी इन्फिनिटी मॉलमध्ये गेली होती. सायंकाळी साडेसात वाजता ते सर्वजण घरी आले. जेवण करुन ते तिघेही झोपण्यासाठी गेले होते. रात्री पावणेतीन वाजता तिला जाग आली. यावेळी तिला दुसर्‍या रुममध्ये काहीतरी आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ती बेडरुमच्या दिशेने गेली, यावेळी बेडरुम उघडाच होता. यावेळी तिला बाथरुमची खिडकी उघडी असल्याचे दिसून आली. काही वेळानंतर ती झोपण्यासाठी गेली. दुसर्‍या दिवशी तिने घडलेला प्रकार तिच्या सूनेला सांगितला. त्यामुळे तिने बेडरुममध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.

कपाटातील सेफ लॉकर, नातीच्या रुममधील काही वस्तू तसेच सूनेच्या रुममधून काही कॅश चोरी गेल्याचे दिसून आले. या लॉकरमध्ये तीन पासपोर्ट, विदेशी चलन, विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने, दोन महागडे घड्याळ, चांदीचे दागिने आणि वस्तू असा 1 कोटी 37 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता. या प्रकारानंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कृष्णाकुमारी सिंग हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ओशिवरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कदम, सहाय्यक फौजदार शिंदे, पोलीस हवालदार ताडगे, पवार, जगदाळे, पाटील, मुजावर, पोलीस शिपाई सुतार, सकट, अवघडे, पाटील, बोराटे, भंगड, कोळेकर, कदम यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शनिवारी मनोज राठोडला ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. चोरीचा मुद्देमाल त्याने त्याच्या राहत्या घरासह सोनाराकडे ठेवल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्याकडून 1 कोटी 26 लाख 40 हजार 450 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोजविरुद्ध ओशिवरा आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात चौदाहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून उर्वरित चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कदम यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page