ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या दुकलीस अटक

बँकेशी संबंधित दस्तावेजासह मोबाईल क्यूआर स्कॅनर, मुद्रांक जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जानेवारी 2026
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना मोठ्या प्रमाणात बँक खाती पुरविणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना फोर्ट परिसरातून पोलिसांनी अटक केली. मोहम्मद करीम इद्रीस अहमद आणि फैजान अहमद बकर खासाब अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेश, प्रयागराज तर कर्नाटकचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकोणीस डेबीट कार्ड, तीस चेकबुक, पासबुक, दोन मुद्रांक, तीन सिमकार्ड, दोन रबरी शिक्के, दोन क्यूआर कोड स्कॅनर, चार मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने शनिवार 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात सायबर फसवणुकीसाठी बोगस दस्तावेज तसेच खरेदी केलेल्या बँक खात्याचा सायबर ठगांना वापर करण्यासाठी देणार्‍या काही टोळ्या सक्रिय असल्याचा अनेक तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्‍या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अशा आरोपींची माहिती काढून त्यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना फोर्ट परिसरात ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणारे काही गुन्हेगार येणार असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास लाब्धे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शेडगे, पोलीस हवालदार जुवाटकर, शैलेश शिंदे, चौधरी, पोलीस शिपाई घाडी, सावंत यांनी फोर्ट परिसरातील डॉर्मेटरीवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद करीम आणि फैजान अहमद या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्या अंगझडतीसह सामानाची तपासणीदरम्यान पोलिसांना विविध बँकेचे डेबीट कार्ड, पासबुक, चेकबुक, सिमकार्ड, रबरी शिक्के, क्यूआर कोड स्कॅनर आणि मोबाईल सापडले. तपासात मोहम्मद करीम हा उत्तरप्रदेशच्या प्रयागराज तर फैजान अहमद हा कर्नाटकचा रहिवाशी आहे. ते दोघेही ऑनलाईन फसवणुक करणार्‍या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. फसवणुकीसाठी ते सायबर ठगांना विविध बँकेचे खाती पुरविण्याचे काम करत होते. प्रत्येक खात्यामागे त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते.

पैशांचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून त्यांचे दस्तावेज घेऊन या दस्तावेजाच्या मदतीने बँकेत खाती उघडले होते. या बँक खात्याची डिटेल्स सायबर ठगांना दिल्यानंतर फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा होत होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्त आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणारी ही सराईत टोळी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page