हायड्रोपोनिक गांजासह विदेशी चलन, सोने व हिरे तस्करीचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – हायड्रोपोनिक गांजासह विदेशी चलन, सोने आणि हिरे तस्करीचा कस्टम अधिकार्‍यांनी पर्दाफाश करुन एकूण पंधराहून अधिक प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी चार प्रवाशांकडून 26 कोटीचा 26 किलो हायड्रोपोनिक गांजा, सहा प्रवाशांकडून सुमारे पाच कोटीचे 3632 ग्रॅम वजनाचे सोने, एक प्रवाशाकडून 1 कोटी 81 लाख रुपयांचे हिरे आणि चार प्रवाशांकडून 1 कोटी 18 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ड्रग्ज तस्करीच्या पहिल्या गुन्ह्यांत दोन प्रवाशांना कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेत या अधिकार्‍यांना 10 किलो 561 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 10 कोटी 56 लाख रुपये इतकी आहे. दोन्ही प्रवाशी बँकाँक येथून आले होते. दुसर्‍या कारवाईत बँकॉकहून आलेल्या अन्य दोन प्रवाशांना या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांनी ट्रॉली बॅगेत हायड्रोपोनिक गांजा आणला होता. या ट्रॉली बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 15 किलो 961 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याची किंमत 15 कोटी 96 लाख रुपये आहे. या दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी चार प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे 26 कोटीचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या चौघांनाही किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सोन्याच्या तस्करीच्या एका गुन्ह्यांत या अधिकार्‍यांनी एका बांगलादेशी नागरिकासह विमानतळावरील कर्मचारी अशा दोघांना अटक केली. आरोपी बांगलादेशी नागरिक हा विदेशातून सोने घेऊन आले होते. ते सोने विमानतळावरील कर्मचारी त्याला बाहेर काढून देणार होता. मात्र त्याची माहिती प्राप्त होताच या अधिकार्‍यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी 24 कॅरेटचे 1470 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत 2 कोटी 10 लाख रुपये इतकी आहे. अन्य एका कारवाईत या अधिकार्‍यांनी चार प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून 2162 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत 2 कोटी 89 लाख रुपये इतकी आहे. अशा प्रकारे या अधिकार्‍यांनी सोने तस्करीप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी 3632 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे.

हिरे तस्करीच्या एका गुन्ह्यांत या अधिकार्‍यांनी एका प्रवाशाला अटक केली. या प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी 10660 कॅरेटचे 2132 ग्रॅम वजनाचे हिरे जप्त केले असून त्याची किंमत 1 कोटी 81 लाख रुपये आहे. या प्रवाशाने ते हिरे त्याच्या चेकइन बॅगेजमध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. विदेशी चलनाची तस्करीच तीन गुन्ह्यांत चार प्रवाशांना या अधिकार्‍यांनी अटक केली. या चारही प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी 1 कोटी 18 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. ते सर्वजण विदेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मात्र विदेशात जाण्यापूर्वीच त्यांना या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीसह बॅगेची तपासणी केल्यानंतर या विदेशी तस्करीचा पर्दाफाश करण्यात या अधिकार्‍यांना यश आले. त्यांनी ते विदेशी चलन हॅड बॅगेजमध्ये लपवून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page