अंडरट्रायल कैद्याकडून पोलीस शिपायावर प्राणघातक हल्ला
आर्थर रोड कारागृहातील घटनेने पोलिसांमध्ये संताप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – दिडोंशी कोर्टातून कारागृहात नेताना एका अंडरट्रायल कैद्याने पोलीस शिपायावर शिवीगाळ करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात हनी बाबूराव वाघ यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली होती. याप्रकरणी लोकेंद्र उदयसिंग रावत या 35 वर्षांच्या कैद्याविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कैद्याकडून पोलिसाला झालेल्या मारहाणीने घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. लोकेंद्र रावतला लवकरच कोर्टाची परवानगीनंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हनी वाघ हे सध्या ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दल दोनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक आर्थर रोड कारागृहात होती. मंगळवारी 27 जानेवारीला ते सकाळी आठ वाजता कारागृहात हजर झाले होते. यावेळी त्यांना 24 तासांची ड्यूटी देण्यात आली होती. याच कारागृहात लोकेंद्र रावत हा अंडरट्रायल कैदी आहे. मंगळवारी त्याला सकाळीच दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे सायंकाळी त्याला इतर कैद्यासोबत आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले होते. यावेळी हनी वाघ हे कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कर्तव्य बजावत होते.
रात्री नऊ वाजता योकेंद्र रावतला पोलीस शिपाई सुरेश संडू माळी आणि सचिन चव्हाण हे कारागृहात नेत असताना तो गेटजवळ बसला होता. त्याच्या मनात कुठल्या तरी कारणावरुन राग होता. याच रागातून त्याने हनी वाघ यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. त्यांच्या नाकावर डोक्याने जोरात मारहाण केल्याने ते जखमी झाले होते. हा प्रकार तिथे उपस्थित इतर पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र लोकेंद्र हा प्रचंड आक्रमक झाला होता. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेतले होते. हल्ल्यात हनी वाघ हे जखमी झाल्याने त्यांना तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच ना. म जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हनी वाघ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लोकेंद्र रावत याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.