57 लाखांच्या हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
विनोद ज्वेलर्सच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे 57 लाख रुपयांच्या हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनोद ज्वेलर्सचे मालक विजयकुमार पारसमलल बापना (41) याच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विजयकुमारने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
जितेंद्र मदनराज छाजेड हे गोल्ड डायमंड ज्वेलरी व्यावसायिक असून अंधेरी परिसरात राहतात. त्यांचा पद्यप्रभू डायमंड नावाचे मालाडच्या दप्तरी रोड, डायमंड मार्केटमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयातून ते विविध ज्वेलर्स व्यापार्यांना होलसेलमध्ये हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. अनेकदा त्यांच्यातील व्यवहार विश्वासावर तसेच क्रेडिटवर चालते. त्यामुळे व्यापारी दागिने घेतल्यांनतर दिलेल्या मुदतीत पेमेंट करतात. विजयकुमारचे वडिल पारसमल बापना हे त्यांच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना गेल्या अठरा वर्षांपासून ओळखतात.
बापना कुटुंबिय हे गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, हिना गौरव ज्वेल्स सहकारी सोसायटीत राहतात तर त्यांचा मालाडच्या गोकुळधाम परिसरात विनोद ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. पारसमल बापना यांनी त्यांच्याकडून अनेकदा हिरेजडीत दागिने क्रेडिटवर घेतले होते, दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केल्यानंतर त्यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. कोरोना काळात त्यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर विजयकुमार याच्यासोबत त्यांचा व्यवहार सुरु होता. त्यानेही अनेकदा त्यांच्याकडून दागिने घेऊन त्याचे पेमेंट वेळेवर देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
एप्रिल 2024 रोजी त्यांनी त्यांच्याकडे काही हिरेजडीत दागिन्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला 57 लाख 24 हजार 767 रुपयांचे 376 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेट सोन्याचे तसेच 56 कॅरेटचे विविध हिरेजडीत सोन्याचे दागिने क्रेडिटवर दिले होते. महिन्याभरात पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन विजयकुमार त्यांच्या कार्यालयातून निघून गेला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिन्यांचे पेमेंट केले नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पाठपुरावा करत होते. मात्र त्याने त्यांना हिरेजडीत सोन्याचे दागिने दिले नाही किंवा त्यांचे पेमेंट दिले नाही. त्यामुळे ते त्याच्या विनोद ज्वेलर्स दुकानात गेले होते. यावेळी त्याने त्यांना दागिने दिले नाही असा आरोप करुन दागिने किंवा पैशांची मागणी केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन विजयकुमारने त्यांची फसवणुक केली होती.
त्यामुळे त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विजयकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयांचा तपास सुरु असून विजयकुमार बापना याची पोलिसांकडून चोकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगितले.