देवाच्या चांदीच्या मूर्त्यासह पूजेच्या साहित्यांवर हातसफाई

वॉण्टेड असलेल्या नोकराला एक महिन्यांनी अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 फेब्रुवारी 2026
मुंबई, – घरात घरकाम करताना देवघरातील देवांच्या चांदीच्या मूर्त्यांसह पूजेच्या साहित्यांवर हातसफाई करुन पळून गेलेल्या एका नोकराला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. शिवरंजन जगलाल महंतो असे या आरोपी नोकराचे नाव असून चोरीनंतर तो पळून गेला होता. अखेर एक महिन्यानंतर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रिया केडिया ही महिला तिचा पती निपून आणि मुलगी श्रेणिका यांच्यासोबत सांताक्रुज येथील जुहू-कोळीवाडा, विश्वशांती अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्याकडे शिवकुमार चौधरी हा घरकामाला होता. 2023 पासून तो तिच्याकडे काम करत होता. मात्र नोव्हेंबर 2025 रोजी त्याने नोकरी सोडून दिली होती. त्यापूर्वी त्याने तिथे शिवरंजन याला नोकरीसाठी ठेवले होते. शिवकुमार हा तिचा विश्वासू नोकर होता, त्यामुळे त्याने शिफारस केल्याने तिने शिवरंजनला घरी घरकामासाठी ठेवले होते.

नोव्हेंबर 2025 पासून तो तिच्याकडे कामावर होता. श्रिया केडिया हिच्या घरातील हॉलमध्ये एक देवघर असून याच देवघरात सर्व देवांच्या मूर्त्यांसह पूजेचे साहित्य चांदी होत्या. 10 जानेवारीला सकाळी आठ वाजता श्रिया ही झोपेतून उठली होती. यावेळी तिला घरात शिवरंजन कुठेच दिसला नाही. त्याचा शोध घेत असताना ती देवघरात गेली होती. यावेळी तिला देवघरातील चांदीच्या सर्व देवांच्या मूर्त्यांसह पूजेचे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले.

त्यात मोठी व लहान आकाराच्या चांदीच्या दोन थाळी, चार चांदीच्या लहान वाटी, तीन पणत्या, एक कळस, घंटा, त्रिशुल, एक गणेश, लक्ष्मी मूर्ती, कार्तिकेयन मूर्ती आदी चार लाखांच्या मुद्देमालाचा समावेश होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच या महिलेने सांताक्रुज पोलिसांना ही माहिती सांगितली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा नोकर शिवरंजन याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

याच गुन्ह्यांत गेल्या एक महिन्यांपासून शिवरंजन हा फरार होता. त्याचा शोध सुरु असताना त्याला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून लवकरच चोरीचे सर्व साहित्य हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page