सातारा एमडी ड्रग्ज फॅक्टरीप्रकरणी कारागृह हवालदाराला अटक

आरोपीस कारागृहात असताना मदत करुन आर्थिक मोबदला घेतला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सुमारे 115 कोटीच्या रुपयांच्या सातारा येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरीप्रकरणी सोलापूर कारागृहाचा हवालदार बाळू चव्हाण याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या कटातील एक मुख्य आरोपी फैय्याज शेखला सोलापूर कारागृहात असताना मदत करुन त्याच्याकडून आर्थिक मोबदला घेतल्याचा बाळू चव्हाणवर आरोप आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

9 ऑक्टोंबरला सलीम शेख आणि रईस शेख या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना 136 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्यांच्या चौकशीतून विशाल मोरे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने विशालला पुण्यातून अटक केली. चौकशीत सलीम आणि रईस हे दोघेही विक्रोळीचे तर विशाल पुण्याचा रहिवाशी असून विशालने त्यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. सातारा येथून विशालने एमडी ड्रग्ज आणले होते. याच ड्रग्जची तो त्याच्या सहकार्‍याचंया मदतीने मुंबईसह इतर शहरात विक्री करत होता. त्यांच्या चौकशीत सातारा येथील जावळी, बामनोलीच्या सावरीगावात एका शेतातील प्लॅस्टट नसलेल्या विटांच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते.

या माहितीनंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी साडेसात किलो एमडी ड्रग्ज, 38 किलो एमडीचे लिक्वीड आणि इतर कच्चा माल असा सुमारे 115 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. तपासात आरोपींनी शेतातील एका जागेवर शेड बांधून तिथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु केला होता. याच गुन्ह्यांतील भाईंदर आणि आसाममधील काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पथकाने भाईंदर येथून कुरी व्हिला चेरियाण तर आसाम येथून कायम सय्यद, राजीकुल रेहमान आणि हाविजुल इस्लाम या चौघांना अटक केली होती.

चौकशीत या शेतजमिनीचा मालक गोविंद बाबाजी सिंदकर असून ही जागा त्यांनी ओमकार तुकाराम दिघे यांच्या मार्फत सद्दाम नजर अब्बास सय्यद यांना भाडेतत्त्वावर दिली होती. त्यानंतर तिथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु करण्यात आला होता. या कारखान्यातून तयार झालेले एमडी ड्रग्ज नंतर मुंबईसह इतर शहरात तसेच राज्यात विक्रीसाठी पाठविला जात होता. एमडी ड्रग्ज खरेदी-विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले होते. या कटात फैय्याज शेख याचा सहभाग उघडकीस आला होता. तोच या कटाचा मुख्य आरोपी असून गेल्या दिड वर्षांपासून सोलापूर कारागृहात बंदिस्त होता.

याच कारागृहात असताना त्याला बाळू चव्हाण याने मदत केली होती. त्याला मोबाईल दिला होता. कारागृहात असताना तो त्याचे ड्रग्जचा व्यवहार करत होता. त्याला मदत करुन बाळूने त्याच्याकडून आर्थिक मोबदला घेतला होता. त्याच्याच मदतीमुळे त्याने सातारा येथे एमडी ड्रग्जची फॅक्टरी सुरु केली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच बाळू चव्हाणला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच गुन्ह्यांत फैय्याजचा मुलगा फहाद शेख याला सहआरोपी करण्यात आले असून तो वॉण्टेड आहे. सध्या तो दुबईतून ड्रग्जचे व्यवहार पाहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page