विलेपार्ले येथे ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमडी-कोकेनचा 11 कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विलेपार्ले येथे ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका 21 वर्षांच्या तरुणाला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अक्षयी अशोकन कंडियील असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी सात कोटी सहा लाख रुपयांचे 3 किलो 530 ग्रॅम वजनाचे एमडी तर चार कोटी बावीस लाख रुपयांचे 422 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षयी नावाचा एक व्यक्ती ड्रग्जची विक्री करत असून तो ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक् उत्कर्ष वझे, पोलीस उपनिरीक्षक सुजीत म्हैसधुणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल म्हाळसंक, पोलीस हवालदार विशांत भिंगारदेवे, मिलिंद परब, बाबासाहेब शेळके, पोलीस शिपाई राकेश कदम यांनी विलेपार्ले परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी विलेपार्ले येथील सहार रोड, गरवारे सिग्नलजवळील नागोरी हॉटेलसमोर अक्षयी हा आला होता.

त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 3 किलो 530 ग्रॅम वजनाचे एमडी, 422 ग्रॅम वजनाचे कोकेनचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 11 कोटी 28 लाख रुपये इतकी आहेत. तपासात त्याने एमडी आणि कोकेन केरळ येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अक्षयी हा मूळचा केरळच्या पेरासंनुर, मलप्पपुरम, कुट्टीपुरमच्या पेरासंनूरचा रहिवाशी असून चालक म्हणून काम करतो. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page