अनधिकृत कारवाईसाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला

कटरने हल्ला करणार्‍या तरुणाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंबई, – अनधिकृत कारवाईसाठी गेलेल्या दोन पोलिसांवर एका तरुणाने कटरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपाई भाऊसाहेब बबन पिंगळे आणि गजानन रंगराव कल्याणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन मोहम्मद सैफ गुलहसन इद्रीसी या 25 वर्षांच्या हल्लेखोर तरुणाला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता वडाळा येथील सॉल्टपॅन, शांतीनगर परिसरात घडली. सुधीर वसंतराव पाटील हे मूळचे जळगावच्या एरंडोलचे रहिवाशी असून राज्य राखीव पोलीस दलात सध्या पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. वडाळा येथील सॉल्टपॅन, शांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाची जागा असून या जागेवर काही लोकांनी अनधिकृत झोपड्या बांधल्या आहेत. याबाबत काही तक्रारी वन अधिकार्‍यांना प्राप्त झाले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी वन अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या मदतीने तिथे अनधिकृत झोपड्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे संबंधित अधिकारी पोलिसांसह अनधिकृत झोपड्यावर कारवाई करत होते. यावेळी तिथे मोहम्मद सैफ या तरुणाने त्यांना विरोध करुन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मोहम्मद सैफला बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने पोलिसांशीही हुज्जत घालून तिथे सुरु असलेल्या कारवाईला विरोध केला होता. या प्रकाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याच दरम्यान काही कळण्यापूर्वी मोहम्मद सैफने पोलीस शिपाई भाऊसाहेब पिंगळे आणि गजानन कल्याणे यांच्यावर त्याच्याकडील कटरने वार केले होते. या हल्ल्यात भाऊसाहेब यांच्या डाव्या हाताला, पाठीला तर गजानन यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या प्रकारानंतर इतर पोलिसांनी बळाचा वापर करुन मोहम्मद सैफला ताब्यात घेतले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही पोलिसांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले.

या प्रकारानंतर सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद सैफ याच्यावर हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page