नामांकित बँकेच्या निवृत्त मॅनेजरची 1.83 कोटीची फसवणुक

डिजीटल अरेस्टची धमकी देणार्‍या सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – शहरातील नामांकित बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या वयोवृद्ध मॅनेजरला डिजीटल अरेस्टची धमकी देऊन अज्ञात सायबर ठगाने 1 कोटी 83 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित चारही सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या ठगांनी तक्रारदारासह त्यांची पत्नी आणि मुलीला त्यांच्या शेअरसह दागिने विकायला तसेच एफडी तोडून ती रक्कम दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुलुंड परिसरात घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशोक महादेव साळवी हे 62 वर्षांचे वयोवृद्ध मुलुंड परिसरात राहत असून एका नामांकित बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा ओमकार हा जर्मनी येथे कामाला आहे तर पत्नी अस्मिता ही एलआयसीमध्ये सहाय्यक पदावर काम करत होती. गेल्या वर्षी तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 7 जानेवारीला त्यांना एका अज्ञात महिलेने कॉल करुन ती टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांची चौकशी होणार आहे. काही वेळानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून त्यांचा आधारकार्ड सीबीआयच्या क्राईम लिस्टमध्ये आहे. त्यामुळे त्यांची दिल्लीतील सीबीआय अधिकार्‍यांकडूनही चौकशी होणार असल्याचे सांगितले.

त्याचा कॉल संपल्यानंतर त्यांना प्रदीप सावंत आणि जय प्रभाकर चौगुले नाव सांगणार्‍या दोन व्यक्तींचा कॉल आला होता. त्यांनी ते दोघेही सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली होती. त्यांच्या बँकेत एक खाते उघडण्यात आले असून त्याचा वापर नरेश गोयल याने केला होता. या खात्यात दोन कोटीचा आर्थिक घोटाळा झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तोपर्यंत त्यांच्यासह पत्नी आणि मुलीला त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट करण्यात आली आहे असे सांगून चौकशी पूर्ण होईपर्यंत ही माहिती बाहेर शेअर करु नका. दर दोन तासांनी रिपोटींग करुन त्यांची चौकशी होणार आहे.

काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह बँक खाते, ठेवी तसेच दागिन्यांविषयी तपशील एका कागदावर लिहून ठेवण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यासह इतर तपशील त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी बँकेतील रक्कमेसह शेअर आणि दागिने विक्री करण्याचा सल्ला दिला. ही रक्कम बँक खात्यात जमा करुन त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. चौकशी पूर्ण होताच ही रक्कम त्यांच्या बॅक खात्यात जमा होईल असे सांगितले. अटकेच्या भीतीने त्यांनी जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत टप्याटप्याने वेगवेगळ्या बँक खात्यात 1 कोटी 83 लाख 40 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.

11 फेब्रुवारीपासून त्यांनी त्यांच्याशी संपर्क बंद केला होता. डिजीटल अरेस्टच्या नावाने या व्यक्तींकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्व सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page