पगार दिला नाही म्हणून पिझ्झा शॉपच्या डिलीव्हरी बॉयकडून चोरी
चोरीच्या गुन्ह्यांत पळून गेलेल्या डिलीव्हरी बॉयला अटक
अरुण सावरटकर
23 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सहा ते सात दिवसांचा पगार दिला नाही म्हणून रागाच्या भरात डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणार्या कर्मचार्यानेच पिझ्झा शॉपमधील कॅश काऊंटरमधील कॅश चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या समीर रफिक शेख या आरोपी डिलीव्हरी बॉयला कांदिवली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
खुशबू सुरेश यादव ही तरुणी नालासोपारा येथे राहते. सध्या ती कांदिवलीतील महावीरनगर, एमएचबी कॉलनीतील लापिनोझ पिझ्झा शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. या शॉपचे मालक उमंग जैन आणि निकुंज भाटिया आहेत. शॉपमध्ये नऊ कर्मचारी कामाला असून गेल्या दिड महिन्यांपासून समीर शेख हा डिलीव्हरी बॉयमध्ये कामाला लागला होता. 12 जानेवारीला त्याचा पहिला पगार झाला होता. मात्र पगार होताच तो कामावर येत नव्हता. कामावर आला तर सुट्टी घेऊन घरी जात होता. त्यामुळे त्याला 15 फेब्रुवारीला कामावर न येण्यास सांगण्यात आले होते. यावेळी त्याचा सहा ते सात दिवसांचा पगार बाकी होता.
तो त्याचा सहा ते सात दिवसांचा पगार घेण्यासाठी शॉपमध्ये आला होता. यावेळी खुशबूने त्याला पगार दिला नाही. त्याला उमंग जैन यांच्याशी बोलण्यास सांगून तिने त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता. मात्र त्याचे उमंग जैनशी मोबाईलवर संभाषण झाले नाही. 18 फेब्रुवारीला तो पुन्हा शॉपमध्ये आला आणि त्याने त्याच्या पगाराची मागणी सुरु केली होती. यावेळी उमंग जैन यांनी त्याला काही दिवसांनी येण्यास सांगितली. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे तो कॅश काऊंटरजवळ गेला आणि त्याने कॅश काऊंटरमधील दिवसभराची जमा झालेली चौदा हजाराची कॅश घेतली.
यावेळी त्याला खुशबूसह इतर कर्मचार्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकून न घेता तेथून पळून गेला होता. हा प्रकार खुशबूने निकुंज भाटिया यांना दिली. त्यांनी तिला समीरविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने मालकाच्या सांगण्यावरुन कांदिवली पोलिसांत समीरविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शुक्रवारी चोरीच्या गुन्ह्यांत पळून गेलेल्या समीर शेख याला कांदिवली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने सहा ते सात दिवसांचा पगार दिला नाही म्हणून रागाच्या भरात शॉपमधील कॅश काऊंटरमधील चौदा हजाराची कॅश चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. समीर हा बोरिवलीतील दत्तपाडा रोड, राजेंद्रनगर हनुमान मंदिरजवळ राहतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.