ज्वेलर्स व्यापार्‍याच्या घरी झालेल्या २३ लाखांचा घरफोडीचा पर्दाफाश

गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मालाड येथे राहणार्‍या एका ज्वेलर्स व्यापार्‍याच्या घरी झालेल्या सुमारे २३ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात दिडोंशी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना दिडोंशी पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. सिद्धेश जितू शेट्टीयार आणि रजनीश सोहनलाल गुप्ता ऊर्फ गब्बर अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २२ लाख ८५ हजार ४९८ रुपयांचे सोन्याचे १२६ ग्रॅम तर चांदीचे २३४ ग्रॅम वजनाचे दागिने आणि २९ हजाराची कॅश असा २३ लाख १४ हजार ४९८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

४० वर्षाचे तक्रारदार सुजीत रवीन पात्रा हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या बाणडोंगरी, दत्त मंदिर रोड, पुप्पा पार्कच्या प्रेसवाला चाळीत राहतात.८ ऑक्टोंबरला ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅशचा समावेश होता. हा प्रकार नंतर सुजीत पात्रा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुजीत पात्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यातील एका फुटेजमध्ये सिद्धेश शेट्टीयार हा ८ ऑक्टोंबरला दुपारी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान संशयास्पद फिरत असताना दिसून आला. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.

याच दरम्यान त्याला मालाडच्या बाणडोंगरी, दत्तर मंदिर रोड परिसरातून सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक शरद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस हवालदार नवनाथ बोराटे, अमीत पंडित, निलेश सांबरेकर, अशोक खोसरे, पोलीस शिपाई सागर तामकर आदी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची तसेच याकामी त्याला रजनीश गुप्ता याने मदत केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पळून गेलेल्या रजनीशला मिरारोडच्या पेंनकरपाड्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

या दोघांकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे विविध दागिने आणि कॅश असा २३ लाख १४ हजार ४९८ रुपयांचा संपूर्ण चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी अलीकडेच्या काळात अशाच प्रकारे घरफोडीसह इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page