रक्षा ज्वेलर्सच्या १.३० कोटीच्या चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश

दागिन्यांवर डल्ला मारणार्‍या नोकरासह चौघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गेल्या आठवड्यात मालाड येथील रक्षा ज्वेलर्समध्ये झालेल्या एक कोटी तीस लाखांच्या चोरीचा पर्दाफाश करण्यात अखेर मालाड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणार्‍या एका नोकरासह त्याच्या तिन्ही सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. खुमानसिंग तुलसीसिंह दसाना ऊर्फ खुमानसिंह राजपूत, सोहनसिंह तुलसीसिंह दसाना, सुमानसिंह भुरसिंह दसाना आणि गणेशसिंह दुलासिंग कडेचा अशी या तिघांची नावे आहेत. या चौघांकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

विकास छोगालाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा मालाडच्या साईनाथ रोड, नटराज मार्केट, वसंत प्लाझासमोरच रक्षा ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलरी शॉप आहे. २०१२ साली त्यांनी ते शॉप भाड्याने घेतला होता. तेव्हापासून ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री करतात. त्यांच्याकडे भेरुलाल प्रेमचंदजी राठोड, मदनसिंग वसंतसिंग आणि खुमानसिंग राजपूत हे तिघेही कामाला आहेत. त्यापैकी भेरुलाल हा त्यांचा नातेवाईक असून तो दिवसा शॉपमध्ये काम करतो आणि रात्री त्यांच्या घरी झोपत होता. अनेकदा तोच सकाळी चावी घेऊन शॉप उघडून रात्री शॉप बंद करुन घरी येत होता. २ ऑक्टोंबरला विकास जैन हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राजस्थान येथील शिकर, गुरु आचार्य महाश्रमण यांच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी ज्वेलर्स शॉपची जबाबदारी भेरुलाल राठोड याच्याकडे सोपविली होती.

शनिवारी ३ ऑक्टोंबरला सकाळी भेरुलाल हा नेहमीप्रमाणे शॉपमध्ये गेला होता. मात्र त्याच्याकडील पाचपैकी एका चावीने शॉपचे लॉक उघडले नाही. चौकशीनंतर त्यांना रात्री खुमानसिंगने शॉप बंद केला होता. मात्र त्याने शॉपची चावी त्याला दिली नव्हती. त्यामुळे त्याने खुमानसिंगला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार त्याने विकास जैन यांना सांगितला. त्यामुळे ते रात्री उशिरा विमानाने मुंबईत परत आले होते. रात्री साडेअकरा वाजता ते शॉपमध्ये आले होते. भेरुलालकडील चाव्या घेतल्यानंतर त्या चाव्या शॉपच्या नसल्याचे दिसून आले होते. खुमानसिंगने त्याला दुसर्‍या चाव्या दिल्या होत्या. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी शॉपचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. आत गेल्यानंतर त्यांना शॉपमधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.

शॉपमधील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने असा १ कोटी ३० लाख ३७ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्यामुळे त्यांनी शॉपच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजमध्ये खुमानसिंग हा त्याच्या तीन मित्रांसोबत शॉपमध्ये घुसल्याचे तसेच त्यानेच मित्रांच्या मदतीने एक कोटी तीस लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारुन तेथून पलायन केले होते. शॉपमधून बाहेर जाताना ते चौघेही पिशव्या घेऊन जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच विकास जैन यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुमानसिंग राजपूतसह इतर तिघांविरुद्ध चोरीसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु केली होती. तपासात ते सर्वजण त्यांच्या गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पळून गेलेल्या खुमानसिंह दसाना, त्याचा भाऊ सोहनसिंह दसाना, दोन नातेवाईक सुमानसिंह दसाना आणि गणेशसिंह कडेचा या चौघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनीच ही चोरी केलयची कबुली दिली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहे. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page