कॅन्सरवर शंभर टक्के उपचार करण्याचा दावा करुन महिलेची फसवणुक
उपचारासाठी ६९ लाखांचा सोन्यासह कॅशचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – कॅन्सरवर पूजा आणि विधीद्वारे शंभर टक्के उपचार करण्याचा दावा करुन एका वयोवृद्ध महिलेची दोन भोंदूबाबांनी फसवणुक केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजशेखर शास्त्री आणि गुरुजी आदित्यनाथ ऊर्फ बाबू गुरुजी या दोन्ही भोंदूबाबांविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या एक वर्षांत या दोघांनी तक्रारदार महिलेकडून सोन्याचे दागिने आणि कॅश मिळून ६९ लाख रुपये घेऊन तिची फसवणुक केली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
६० वर्षांची जयंती गोपाळकृष्णन ही वयोवृद्ध महिला चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहते. गेल्या बारा वर्षांपासून ती एकांकी जीवन जगत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिची ५१ वर्षांची बहिण जगथी अनुप ही ठाण्यात राहत असून तिला फुफ्फुसासह यकृतचा कॅन्सर णाला असून या आजारावर तिचे उपचार सुरु आहे. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करुनही तिच्यावर काहीच सुधारणा झाली नव्हती. तिच्या उपचारावर प्रचंड खर्च झाला होता, तरीही तिच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा नव्हती. जून २०२५ रोजी ती टिळकनगर कॉलनीतून जात होती. यावेळी तिला गुरुजी हनुमान उपासक आदित्यनाथ गुरुजी याची एक जाहिरात दिसली होती.
या जाहिरातीमध्ये सगळ्या समस्याचे निवारण होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे तिने जाहिरातीमध्ये दिलेल्या चेंबूर येथील टिळकनगर, निसर्ग सहकारी सोसायटीच्या तळमजल्यावरील शॉप क्रमांक अकरामध्ये गुरुजी आदित्यनाथची भेट घेतली होती. यावेळी तिला राजशेखर शास्त्रीने गुरुजी ज्योतिष शास्त्रावरुन प्रत्येक समस्येवर उपाय सांगतात, त्यात शंभर टक्के यश प्राप्त होते. त्यामुळे तिने गुरुजींची भेट घेऊन तिच्या बहिणीच्या कॅन्सरची माहिती देताना तिच्या प्रकृती सुधारणा होईल याबाबत उपाय सुचविण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने टेबलच्या ड्राव्हरमधून आठ कवड्या काढल्या. त्या टेबलावर टाकून काही कवड्या हाताने बाजूला केल्या. तुमच्या बहिणीच्या घरावर करणी बाधा झाली आहे. यावर कायमचा तोडगा काढण्याचे त्याने तिला आश्वासन दिले होते.
दुसर्या दिवशी राजशेखर आणि गुरुजी आदित्यनाथ तिच्या घरी गेले होत. यावेळी त्यांनी तिला त्यांना तिच्या आईने बहिणीच्या उपचारासाठी पाठविले आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी एका स्टिलच्या डब्ब्यात पाणी ओतून काळ्या धाग्याने घट्ट सर्व बाजूंनी बांधले होते. डब्ब्यात लिंबू ठेवून बंद केला. या डब्ब्याला कोणीही हात लावू नका असे सांगून ते दोघेही तीन दिवसांनी पुन्हा तिच्या घरी आले. डब्बा उघडल्यानंतर त्यात लिंबू नव्हता. त्यामुळे तिला गुरुजी आदित्यनाथने चमत्कार केल्याचे वाटले. तिच्या बहिणीला शंभर टक्के बरा करतो असे सांगून याबाबत कोणालाही काहीही सांगू नका. आम्ही आतापर्यंत अनेक पूजा आणि विधी केल्या आहेत, त्यातील एकही पूजा फेल झाली नाही. शंभर रक्कम समस्येवर निवारण झाल्याचा दावा केला. त्यामुळे तिने बहिणीच्या आजारावर पूजा आणि विधीसाठी होकार दर्शविला होता.
काही दिवसांनी त्यांनी तिला ४८ मंडळ, ग्रह पूजा या कामाख्या मंदिरात आणि काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करावी लागेल असे सांगून तिच्याकडून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्यांना टप्याट्याने पैसे दिले होते. डिसेंबर २०२५ म्हणजे जवळपास सहा महिने उलटूनही तिच्या बहिणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. राजशेखरला कॉल केल्यानंतर तो गुरुजी आदित्यनाथ बहिणीसाठी पूजा करत आहे असे सांगत होता, मात्र त्याने एकदाही तिच्या समोर कुठलीही पूजा किंवा विधी केली नव्हती. मार्च २०२६ रोजी तिच्या बहिणीची गाठ जास्त वाढल्याने तिच्या प्रकृती बिघडली होती. यावेळी गुरुजी आदित्यनाथने पूजेसाठी त्याचे ८५ वर्षांचे ज्येष्ठ गुरुजाींकडून पूजा करावी लागेल असे सांगून पुन्हा पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्यांना पुन्हा पैसे दिले होते.
पूजेसाठी सोन्याचा एक दागिना हवा होता, त्यामुळे तिने एक सोनसाखळीही दिली होती. मात्र इतके महिने उलटूनही पूजा आणि विधी करुन तिच्या बहिणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट तिची प्रकृती आणखीन बिघडली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला शंभर टक्के बरे वाटेल, थोडा धीर धरण्यास सांगितले. आणखीन पूजा आणि विधीसाठी ते पैशांची मागणी करत होती. मात्र तिने आणखीन पैसे देण्यास नकार दिला. यावेळी या दोघांनी पैसे दिले नाहीतर आतापर्यंत केलेली पूजा आणि विधीचा परिणाम शून्य होईल. राजशेखर आणि गुरुजी आदित्यनाथ आजार बरा करण्याची बतावणी करुन तिची फसवणुक करत असल्याचे तिच्या लक्षात आले.
जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत या दोघांनी तिच्याकडून पूजा आणि विधीसाठी एक लाख तीस हजाराची सोनसाखळी आणि ६८ लाखांची कॅश असा ६९ लाख ३० हजार रुपये घेतले होते, मात्र एक वर्षांत तिच्या बहिणीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. ते दोघेही भोंदू असल्याचे लक्षात येताच तिने टिळक्नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत, त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. राजशेखर आणि गुरुजी आदित्यनाथ यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.