डिजीटल अरेस्टची भीती दाखवून कंपनीच्या संचालकाला गंडा
बँक खात्यासह फ्लॅट विक्रीची 1.16 कोटी सायबर ठगांना पाठविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
मुंबई, – नवी मुंबईतील एका नामांकित कंपनीच्या वयोवृद्ध संचालकाला डिजीटल अरेस्टची भीत दाखवून अज्ञात सायबर ठगांने गंडा घातला. बँक खात्यातील रक्कमेसह फ्लॅट विक्रीतून आलेले 1 कोटी 16 लाख रुपये तक्रारदारांनी सायबर ठगांना पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पूर्व सायबर सेल पोलिसांनी पाच ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या काही वर्षांत डिजीटल अरेस्टबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही सायबर ठगांकडून वयोवृद्धांना टार्गेट केले जात असल्याने अशा गुन्ह्यांना आळा घालणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे.
78 वर्षांचे थॉमस मॅथ्यु पुलीकोटील हे व्यवसायाने व्यापारी असून ते मुलुंड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते नवी मुंबईतील महापे परिसरातील फॅब्रिकेशन केमिकल कंपनीत संचालक पदावर काम करतात. त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे अमेरिका आणि दुबई येथे राहतात. 26 डिसेंबर 2025 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी सकाळी नऊ वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने त्याचे नाव विजय खन्ना असल्याचे सांगून तो दिल्लीतील सीबीआयमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे जेट एअरवेजशी संबंधित नरेश गोयल यांच्या मनी लॉड्रिंगची केसचा तपास असून या तपासात त्यांचे नाव समोर आले होे. त्यांच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंगचे दोन कोटी रुपये जमा झाले होते.
या घोटाळ्यात त्यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. यावेळी त्यांनी त्यांचा नरेश गोयल, त्याच्या मनी लॉड्रिंगशी काहीही संबंध नसल्याचे सांगूनही त्याने त्यांचे काहीही ऐकले नाही. वयोवृद्ध असल्याने तुमच्यावर तातडीने अटकेची कारवाई होणार नाही, मात्र ते त्यांच्या घरी डिजीटल अरेस्ट असतील. या कालावधीत त्यांच्यावर त्यांची बाईक नजर असेल. त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास किंवा तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्याशी प्रदीप सावंत, राजेश, रविकुमार आणि विजय खन्ना आदी सीबीआयच्या अधिकार्यांनी टप्याटप्याने चौकशी सुर केली होती. त्यांना घोटाळ्यातील दोन कोटीपैकी ऐंशी टक्के रक्कम जमा करावी लागेल.
त्यांनी ही रक्कम जमा केल्यास त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आशसन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातील अनुक्रमे 14 लाख 90 हजार आणि 1 कोटी 1 लाख 30 हजाराची रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. 26 डिसेंबर 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत त्यांनी जवळपास त्यांना एक कोटी सोळा लाख वीस हजार रुपये पाठविले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या फ्लॅटची विक्री केली होती. तरीही ते त्यांना सतत अटकेसह कारवाईची धमकी देत होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी पोलिसांनी त्यांची फसवणुक केल्याचे सांगून त्यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी पूर्व सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून वेगवेगळे नाव सांगणार्या पाचजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.