वाशी रेल्वे स्थानकात ड्रग्ज डिलीव्हरीसाठी आलेल्या त्रिकुटास अटक

कोट्यवधी रुपयांचे हायड्रो गांजा, कार, तीन मोबाईल व कॅश जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
नवी मुंबई, – वाशी रेल्वे स्थानकात ड्रग्ज डिलीव्हरीसाठी आलेल्या एका टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. श्याम शिवकुमार वनवानी, संदीप दिलीप पाटील आणि अनिकेत सुनिल तेलंगी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही उल्हासनगरासह पुण्यातील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे तेरा कोटीचे हायड्रो गांजासह कार, 28 हजाराची कॅश आणि तीन मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु असून या चौकशीनंतर त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही वर्षांत नवी मुंबईत ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला देण्यात आले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मोहीम हाती घेतली होती. 25 फेबुवारीला वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राहुल मंगलसिंग भोई आणि अशोक सुभाष शिंदे हे परिसरात गस्त घालत होते. गस्त घालताना त्यांना वाशी रेल्वे स्थानकात काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठांना शेअर केली होती.

त्यानंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जहाँगीर मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान बिले, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, काशिनाथ नरळे, वैभव रुपवते, पोलीस हवालदार आव्हाड, वारिंगे, पोलीस शिपाई राहुल भोई, अशोक शिंदे यांनी वाशी रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे एका कारमधून आलेल्या श्याम वनवानी, संदीप पाटील आणि अनिकेत तेलंगी या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या कारच्या झडतीत पोलिसांना 12 कोटी 91 लाख रुपयांचा 12 किलो 910 ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा, 28 हजाराची कॅश आणि तीन मोबाईल सापडले.

या मुद्देमालासह पाच लाखांची पोलिसांनी ताब्यात घेतली होती. तपासात यातील श्याम हा उल्हासनगर तर इतर देघेही पुण्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page