48 हून अधिक घरफोडीची उकल करुन 1.39 कोटीचा मुद्देमाल जप्त
घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2026
ठाणे, – गेल्या दोन वर्षांत दिवा आणि मुंब्रा परिसरात झालेल्या 48 हून अधिक घरफोडीच्या गुन्हयांची उकल करुन गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी 1 कोटी 39 लाख रुपयांचा 1.03 किलो विविध सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. याच गुन्ह्यांत घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार शिवाजी गोपाळ संते या 31 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा टिटवाळाचा रहिवाशी आहे. बंद फ्लॅटच्या बाथरुम, खिडकीचे ग्रिल तोडून तसेच दरवाज्याचे मुख्य दरवाजा कडीकोयंडा लोखंडी रॉडने तोडून तो घरफोडी करुन पळून जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या दोन वर्षांत मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडीचे गुन्हे वाढले होते. बंद फ्लॅटच्या बाथरुम, खिडकीचे ग्रिल तोडून किंवा मुख्य दरवाजा कडीकोयंडा लोखंडी रॉडने तोडून अज्ञात व्यक्तीने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन कपाटातील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत दिवा आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गंभीर दखल घेत अशा आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला आदेश दिले होते.
या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने संमातर तपास सुरु केला होता. गेल्या सहा महिन्यापासून गुन्हे शाखेचे अधिकारी गुन्ह्यांची पद्धत आणि घटनास्थळातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत होते. याच दरम्यान मुंब्रा येथे 8 फेब्रुवारी 2026 रोजी एका फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. या गुन्ह्यांतील सीसीटिव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयित तिथे संशयास्पद फिरताना दिसून आला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल ढावरे आणि सागर सुरळकर यांनी संशयित आरोपी शिवाजी संते असल्याचे ओळखले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, दिपक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल माने, पोलीस हवालदार संदीप महाडिक, प्रशांत निकुंभ, शब्बीर फरास, दिपक जाधव, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, सागर सुरळकर, अमोल ढावरे, मयुर लोखंडे, महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव, पोलीस हवालदार चालक शशिकांत सावंत यांनी टिटवाळा येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत तो घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध कल्याण तालुका आणि सेंट्रल पोलीस ठाण्यात चार घरफोडीचे गुन्हे नोंद होते. यातील काही गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले होते. गेल्या दोन वर्षांत त्याने दिवा आणि मुंब्रा परिसरात 48 घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने या सर्व गुन्ह्यांची उकल करुन त्याच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 39 लाख रुपयांचे एक किलो विविध सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन वर्षांत एकदाही पकडला न गेलेल्या शिवाजी संतेला अटक करुन त्याच्याकडून 48 गुन्हे उघडकीस आणून या गुन्ह्यांतील बहुतांश चोरीचा मुद्देमाल गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. या पोलीस पथकाचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी विशेष कौतुक केले होते.