ईमेल आयडीचा गैरवापर करुन खाजगी कंपनीची फसवणुक

दुसर्‍या बँक खात्यात पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – ईमेल आयडीचा गैरवापर करुन एका खाजगी कंपनीत अज्ञात व्यक्तीने सुमारे 21 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. या व्यक्तीने दुसर्‍या बँक खात्यात पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ही रक्कम एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्याने कंपनीचे खाते उघडणार्‍या व्यक्तीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

कमलेश गयाप्रसाद सिंग हे भाईंदर येथे राहतात. सध्या ते वरळीतील शाह अ‍ॅण्ड नाहर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या विभागात मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीने कार्यालयातीन कामासाठी सांताक्रुज येथील एका पंचतारांकित हॉटैलमध्ये पाच दिवस बजेट मिटींग आयोजित केले होते. 19 मार्च ते 23 मार्च 2026 या कालावधीत ही मिटींग होती. त्यासाठी काही आगाऊ पेमेंट करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर पेमेंटबाबत रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. त्यात त्यांनी काही बिल डिटेल्स शेअर केले होते. तसेच बँक अकाऊंटमध्ये बदल झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अकाऊंट विभागातून संबंधित बँक खात्यात 21 लाख 65 हजार 726 रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते.

पेमेंट पाठविल्यानंतर त्यांनी हॉटेलच्या एमडी सेके्रटरींना फोनवरुन पेमेंटविषयी विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना त्यांच्या कंपनीकडून कोणतेही पेमेंट प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. या प्रकारानंतर कमलेश सिंग यांनी अकाऊंट विभागाला ही माहिती सांगून त्याची शहानिशा करण्यास सांगितले होते. तपासात कंपनीकडून संबंधित पेमेंट न्यू ग्लोबल इंटरप्रायसेस या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या ईमेलमध्ये फेरफार करुन हॉटेलचे बँक खाते बदलून त्याऐवजी संबंधित कंपनीचे बँक खात्यात पेमेंट करण्याची विनंती केली होती.

या विनंतीनंतर संबंधित बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने कमलेश सिंग यांनी मध्य सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या आयडीचा वापर करुन व्यवहाराच्या रक्कमेबाबत समोरील कंपनीचे खाते क्रमांक पाठवून कंपनीला त्याच खात्यात पेमेंट करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. ही रक्कम न्यू ग्लोबल इंटरप्रायजेस कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली होती, त्यामुळे कंपनीशी संबंधित मालकासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page