खोट्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून टॅरोरिडर महिलेकडून खंडणी वसुली
महिला सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार-निवृत्त पोलिसांसह पाचजण अटकेत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2026
मुंबई, – ड्रग्जसह सेक्स रॅकेटच्या खोट्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका टॅरो रिडींग करणार्या महिलेकडे पाच लाखांची खंडणीची मागणी करुन दोन लाखांची खंडणी वसुली करणार्या एका टोळीचा आरे पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन महिलांसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नाली सुनिल नाडेकर, कविता अजय यादव, राहुल सूर्यकांत कांबली, प्रदीप मृत्यूंजय पाठक आणि एरिक गीरगोल वेगस अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवार 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील स्वप्नाली व कविता या सामाजिक कार्यकर्त्या, प्रदीप पत्रकार तर एरिक निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
40 वर्षांची तक्रारदार महिला ही टॅरोरिडिंगर असून अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहते. तिचे आई-वडिल पुण्यात राहत असून ती मुंबईत लोकांचे ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि राशिफळ बघण्याचे काम करते. 13 फेब्रुवारीला तिला राज नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तिला टॅरोरिडींगसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीजवळ बोलाविले होते. त्याने तिची प्रोफाईल पाहून, तिच्याविषयी अनेकांकडून चांगले ऐकल्याचे बतावणी करुन तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे 15 फेब्रुवारीला दुपारी पावणेतीन वाजता ती गोरेगाव येथील आरे कॉलनी, रॉयल पाम येथील व्हिला क्रमांक 415 मध्ये गेली होती. तिथे चार पुरुष आणि दोन महिला होत्या. त्यांनी तिला ते पोलीस असल्याचे सांगून ती ड्रग्ज तस्करीसह वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप केला.
तिच्यावर कारवाईची धमकी देऊन त्यांनी तिच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी एकाने तिला त्याचे पोलीस ओळखपत्र दाखविले होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. तिने त्यांचा विरोध करुन आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने तिने त्यांना ऑनलाईन दोन लाख रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर त्यांनी तिची सुटका केली. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. स्वतची सुटका केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्याने त्याच्या मित्राला तिच्या मदतीसाठी पाठविले होते. त्यानंतर ते दोघेही आरे पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणीसाठी धमकी देणे आणि खंडणी उकाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, गणेश पाटील, पोलीस नाईक महाले, पोलीस शिपाई बरकडे यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात खंडणीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्याचे डिटेल प्राप्त करुन पोलिसांनी फरहान मुस्तफा कादरी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ते पैसे त्याचा नातेवाईक अहमद याच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली.
त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले होते. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना स्वप्नाली नाडेकर, कविता यादव, राहुल कांबली, प्रदीप पाठक आणि एरिक वेगस या पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील स्वप्नाली ही सामाजिक कार्यकर्ता तर कविता यादव हिचा दहिसर येथील रावळपाड्यात युवा टायगर नशा मुक्ती केंद्र नावाची संस्था आहे. प्रदीप पाठक हा पत्रकार असून एरिक वेगस हा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. या चौघांना राहुल कांबलीने गुन्ह्यांत मदत केली होती.
त्यांच्या चौकशीत त्यांनीच तक्रारदार महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिच्यावर कारवाईची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी वसुली केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.