फसवणुकीसाठी ओडिसा येथून विमानाने येणार्‍या आरोपीस अटक

चार गुन्ह्यांची उकल तर 25 एटीएम कार्डसह दोन मोबाईल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2026
मुंबई, – पैसे काढण्यासाठी एटीएमममध्ये येणार्‍या खातेदारांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदल करुन पैसे काढून फसवणुक करणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. संभवकुमार कृष्णचंद्र आचार्य असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा ओडिसाचा रहिवाशी आहे. फसवणुकीचे गुन्हे करण्यासाठी तो ओडिसा येथून विमानाने मुंबईत येत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच चार गुन्ह्यांची उकल झाली असली तरी त्याने मुंबई, ठाणे आणि ओडिसा येथे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कमेसह विविध बँकेचे पंचवीस एटीएम आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

20 फेब्रुवारीला एका वयोवृद्धाची अज्ञात व्यक्तीने फसवणुक केली होती. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्यांना मदतीचा बहाणा करुन या व्यक्तीने त्याच्याकडील एटीएमची अदलाबद करुन त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले होते. या प्रकारानंतर तक्रारदारांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. अशा वाढत्या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक शरद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मोरे, पोलीस हवालदार हेमंत रोडे, शंकर माईंगडे, भोगले, पोलीस शिपाई काटे, जानराव, झिंबल, पोलीस हवालदार सागर पवार यांनी तपास सुरु केला होता. एटीएमसह परिसरातील साठ ते सत्तरहून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने गेल्या एका महिन्यांत वसई आणि नायगाव परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून संभवकुमार आचार्य या आरोपीस ताब्यात घेतले होते.

चौकशीत तो मूळचा ओडिसाचा रहिवाशी असून जुचंद्रा, गोपीकिशन पाटील कॉम्प्लेक्स परिसरात राहतो. तो बिगारी कामगार म्हणून काम करत होता. विविध एटीएम सेंटरची रेकी करुन तो पैसे काढण्यासाठी येणार्‍या खातेदारांना विशेषता वयोवृद्धांना मदत करण्याचा बहाणा करुन त्यांच्या एटीएमची अदलाबदल करत होता. त्यानंतर त्यांच्या कार्डवरुन पैसे काढून पलायन करत होता. अनेकदा तो गुन्हे करण्यासाठी ओडिसा येथून विमानाने मुंबईत येत होता. त्याच्याकडून पोलिसंनी रोख रक्कमेसह विविध बँकेचे 25 हून अधिक एटीएम कार्ड, दोन मोबाईल जप्त केले आहे.

अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने कस्तुरबा मार्ग, वनराई, कुरार आणि दिडोंशी पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीत त्याने मुंबईसह ठाणे आणि ओडिसा येथे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांची माहिती काढली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून संभवकुमार हा अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page