विक्रीसाठी दिलेल्या 1.47 कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
गुन्हा दाखल होताच बंगलोरच्या ज्वेलर्स व्यापार्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – विक्रीसाठी दिलेल्या 1 कोटी 47 लाख रुपयांच्या 587 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी ज्वेलर्स व्यापार्याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. महावीर आर. रोशनलाल असे या आरोपी व्यापार्याचे नाव असून मूळचा कर्नाटकच्या बंगलोरचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत महावीर हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
संजय वालचंद जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांची मनोज ऑर्नामेंटस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपपी असून ही कंपनी विविध ज्वेलर्स व्यापार्यांना होलसेलमध्ये हिर्यासह सोन्याचे दागिने विक्री करते. त्यांचे विलेपार्ले येथे एक शॉप असून त्यांच्याकडे बनविलेले हिरेजडीत सोन्याचे दागिने ते त्यांच्या एजंटमार्फत बंगलोर, चेन्नईसह इतर शहरात मार्केटिंग आणि विक्रीसाठी पाठविले जाते. त्यांच्या परिचित महावीर रोशनलाल हे ज्वेलर्स व्यापारी असून ते बंगलोरचे रहिवाशी आहे. तिथे त्यांच्या मालकीचे श्री गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. त्यांच्या ज्वेलरीचे महावीर हे बंगलोर शहरातील ज्वेलर्स व्यापार्यांना विक्री करतात. या दागिन्यांच्या विक्रीतून त्यांना संजय जैन हे तीन टक्के कमिशन देतात.
गेल्या कित्येत वर्षांपासून त्यांच्यातील व्यवहार सुरु आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्यांनी महावीरला 3946 ग्रॅम वजनाचे हिर्यासह सोन्याचे विविध दागिने विक्रीसाठी पाठविले होते. त्यापैकी 3359 ग्रॅम वजनाचा व्यवहार त्याने पूर्ण केला होता. दागिन्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट तसेच विक्री न झालेले दागिने त्याने त्यांना परत केले होते. मात्र गेल्या चार महिन्यांत त्याने त्यांना 1 कोटी 47 लाख 49 हजार 429 रुपयांचे 587 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांचे पेमेंट केले नाही किंवा विक्री न झालेले दागिने त्यांना परत केले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्केटिंगचे अधिकारी दिलीप गुर्जर यांना बंगलोरला पाठविले होते.
यावेळी महावीरने ते दागिने म्हैसूरमधील काही प्रतिष्ठीत ग्राहकांना दिले आहे, त्यांच्याकडून त्यांना पेमेंट किंवा दागिने मिळाले नाही असे सांगितले होते. गेले चार महिने संजय जैन हे महावीरकडे दागिन्याबाबत पाठपुरावा करत नव्हते. मात्र त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याने त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता. चौकशीदरम्यान महावीरने त्यांच्या दागिन्यांची परस्पर विक्री करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत महावीर रोशनलालविरुद्ध 1.47 कोटीच्या 578 ग्रॅम वजनाच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन संजय जैन यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच महावीरला पोलिसांनी सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने दागिन्यांची विक्री करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.