मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – मोबाईलवरुन विविध हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसमध्ये पुरुष ग्राहकासोबत शारीरिक संबंधासाठी तरुणीसह महिलांना पाठवून ऑनलाईन सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा घाटकोपर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कविता नावाच्या एका वेश्यादलाल महिलेस घाटकोपर पोलिसांनी अटक केली. तिच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. या दोन्ही तरुणींना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. भारतीय न्याय सहिता आणि पिटा कायद्यांतर्गत अटकेची कारवाई केल्यानंतर कविताला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा तसेच पैशांचे आमिष दाखवून कविताने अनेक तरुणीसह महिलांना या सेक्स रॅकेटमध्ये आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
कविता नावाची एक महिला कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात राहत असून ती मोबाईलवरुन सेक्स चालवते. विविध ग्राहकांच्या मागणीनुसार तिच्या संपर्कात असलेल्या तरुणीसह महिलांना घाटकोपर, साकिनाका आणि अंधेरी परिसरातील हॉटेल, लॉज आणि गेस्टमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या माध्यमातून कविताला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. यावेळी कविता आणि ग्राहकांमध्ये मोबाईलवरुन सर्व आर्थिक व्यवहार झाला होता.
तिने त्याला व्हॉटअपवर तीन तरुणीचे फोटो पाठवून तीन तरुणीचे प्रत्येकी तीस हजाराप्रमाणे नव्वद हजार पेमेंट करण्यास सांगितले. मात्र त्याने तिला हॉटेलमध्ये व्यवहार करु असे सांगितले. त्यानंतर तिने त्याला घाटकोपर येथील घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस उपनिरीक्षक शिनगारे, महिला पोलीस शिपाई घरत, मोहीनी घुले, पोलीस शिपाई अभिजीत सोमवंशी आदीचे एक पथक संबंधित हॉटेल परिसरात पाळत ठेवून होते. सोमवारी दुपारी कविता ही दोन तरुणीसोबत हॉटेलमध्ये आली होती. यावेळी बोगस ग्राहकांसोबत तिचे आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे पोलिसांनी छापा टाकून कविताला ताब्यात घेतले.
तिच्यासोबत असलेल्या दोन्ही तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीतून कविता ही मोबाईलवरुन सेक्स रॅकेट चालवत असून तिनेच त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी हॉटेलमध्ये आणल्याची कबुली दिली. याकामी या दोघींना प्रत्येकी पंधरा हजार रुपये देण्याचे तसेच उर्वरित तीस हजार रुपये तिचे कमिशन असल्याचे सांगितले. त्यांच्या कबुलीनंतर कविताला पोलिसांनी अटक केली. तिच्यावर भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे सुटका करण्यात आलेल्या दोन तरुणींना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या दोन्ही महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, त्यांना पैशांचे आमिष दाखवून कविताने सेक्स रॅकेटमध्ये आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.