लोकलमध्ये दिव्यांग व्यक्तीला मारहाणप्रकरणी दोषीवर गुन्हा

महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाची चौकशीनंतर सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – लोकलमध्ये बसण्याच्या वादातून एका दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोषी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून कुर्ला आणि दादर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. याप्रकरणी दोषी महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाची चौकशी करुन नोटीस देऊन सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले. शिवीगाळ केल्यावरुन हा संपूर्ण प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

27 मार्चला सायंकाळी चार वाजता दादर रेल्वे स्थानकातून कर्जत फास्ट लोकलमध्ये दिव्यांगच्या डब्ब्यात एका दिव्यांग व्यक्तीला काही सहप्रवाशी बेदम मारहाण करत होते. त्यात एका महिलेचा समावेश होता. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. सीटवर बसण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर मारहाण करणार्‍या संबंधित दोषी आरोपीविरुद्ध दादर रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव, दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे, सहाय्यक फौजदार दिलीप येळवे, पोलीस हवालदार सचिन जाधव, सचिन आव्हाड, विजय निकाळे, पोलीस शिपाई महेश चव्हाण, महिला पोलीस हवालदार दळवी यांनी तपास सुरु केला होता.

व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी महिला ही तिच्या मुलांसोबत मारहाणीनंतर कुर्ला रेल्वे स्थानकात उतरुन पळून गेली होती. या महिलेची ओळख पटवून तिला काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत ही महिला सांताक्रुज येथे राहत असून ती तिच्या तीन मुलांसोबत गुन्ह्यांच्या वेळेस लोकलमध्ये प्रवास करत होती. तिचे दोन्ही मुली दिव्यांग आहे. प्रवास करताना ज्या व्यक्तीला मारहाण झाली, तो दिव्यांग डब्ब्यात झोपला होता. त्यामुळे तिने त्याला उठवून तिच्या दोन्ही मुलींना बसण्याची जागा द्यावी यासाठी विनंती केली. मात्र त्याने तिला शिवीगाळ केली होती.

त्याचा राग आल्याने तिच्यासह तिच्या मुलाने त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा मनिष राजू होटवाणी यांनी त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ काढला होता. त्याच्याच तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही तासांत आरोपींना शोधून काढून त्यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page