बेवड्या म्हणून हिणवल्यावरुन झालेल्या वादातून तरुणाची हत्या
सहाजणांविरुद्ध हत्येचा गुन्हा तर महिलेसह पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मे 2026
मुंबई, – यह तो बेवडा है असे बोलून हिणवल्याने झालेल्या वादातून साहिल जावेद खान या 20 वर्षांच्या तरुणाची सहाजणांच्या टोळीने हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पाचजणांना मुंबईसह सुरत येथून पोलिसांनी अटक केली. मुज्जफर शेख, मुज्जफर याकूब सय्यद ऊर्फ मुज्जू, यास्मिन मकबूल शेख, सद्दाम भिमा अटके आणि फरहान अन्सारी अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण माहीमच्या प्रकाशनगरचे रहिवाशी आहेत. या गुन्ह्यांत हसन सय्यद याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता माहीम येथील एस. एल रेहजा रोड, रेहजा हॉस्पिटलच्या गेटजवळ झाला. साहिल हा माहीम परिसरात राहत असून यास्मिन ही त्याच्या परिचित आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता साहिल हा रेहजा हॉस्पिटलजवळ होता. यावेळी तिथे आलेल्या यास्मिनने त्याला पाहून यह तो बेवडा है असे बोलून हिणवले होते. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी साहिलने तिला शिवीगाळ केली होती. त्याचा राग आल्याने तिने तिच्या परिचित मुज्जफर शेख, हसन सय्यद, सद्दाम अटके, फरहान अन्सारी आणि मुज्जफर याकूब यांना मोबाईलवरुन कॉल करुन घटनास्थळी बोलावून घेतले होते.
काही वेळानंतर ते सर्वजण तिथे आले होते. यावेळी यास्मिनने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर या सहाजणांनी साहिलला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. तरीही जिवाच्या भीतीने तो तेथून पळू लागला. रेहजा हॉस्पिटलच्या गेट क्रमांक तीनजवळ आल्यानंतर या आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पुन्हा बेदम मारहाण केली होती. त्यात तो बेशुद्ध झाला होता. ही माहिती प्राप्त होताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मारहाणीत जखमी झालेल्या साहिलला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलीस शिपाई दिनेश निंबा बच्छाव यांच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी सहाही आरोपीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या हत्येच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत माहीम पोलिसांना आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने माहीम येथून यास्मिन शेख, सद्दाम अटके आणि फरहान अन्सारी या तिघांना तर मुज्जफर शेख आणि मुज्जफर सय्यद या दोघांना सुरत येथून अटक केली. या दोघांना पुढील चौकशीनंतर मुंबईत आणण्यात आले होते.
अटकेनंतर आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येनंतर हसन सय्यद हा पळून गेला आहे. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक समीर मुलानी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.