शहरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह तिघांचा मृत्यू
तीन स्वतंत्र अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मे 2026
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोहम्मद अझीम अन्सारी, पिरमोहम्मद हसन शेख आणि एका अज्ञात महिलेचा समावेश आहे. या महिलेची ओळख पटली नसून तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत. याप्रकरणी ताडदेव, शिवडी आणि चारकोप पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे. यातील एका गुन्ह्यांतील बाईकस्वाराला चारकोप पोलिसांनी ताब्यात घेतले तर शिवडी आणि ताडदेव अपघातातील चालक अपघातानंतर घटनास्थळाहून पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात बुधवारी 13 मेला सकाळी अकरा वाजता शिवडीतील गाडीअड्डा रोड, पोल क्रमांक 154 ते 155 च्या दरम्यान झाला. रैसा मोहम्मद अझीम अन्सारी ही महिला शिवडी येथे राहत असून हाऊसकिपिंगचे काम करते. तिचे पती मोहम्मद अझीम हे झिनत गारमेंटमध्ये शिलाई कारागिर म्हणून काम करत होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांच्या बाईकवरुन कामावर निघाले होते. अकरा वाजता ते पोल क्रमांक 154 ते 155 जवळून जात होते. यावेळी त्यांच्या बाईकला एका कंटेनरने जोरात धडक दिली होती. त्यांच्या डोक्यावरुन कंटेनरचा चाक गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कंटेनर चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरा अपघात बुधवारी रात्री दहा वाजता कांदिवलीतील गणेशनगर सिग्नलजवळील कांदिवली औद्योगिक वसाहत बसस्टॉपजवळ झाला. इम्तियाज मोहम्मद शेख हा मालाडच्या मालवणी, मार्वे रोड परिसरात राहतो. बुधवारी त्याचे वडिल पिरमोहम्मद शेख हे बाहेर गेले होते. रात्री दहा वाजता ते कांदिवली औद्योगिक वसाहत बसस्टॉपसमोर रस्ता क्रॉस करत होते. यावेळी एका बाईकस्वाराने त्यांना धडक दिली होती. अपघातात ते गंभीरररीत्या जखमी झाल्याने त्यांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पिरमोहम्मद यांना धडक देणार्या बाईकस्वार भरत धोंडीराम नांगरे यानेच हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्याच्या हलगर्जीपणाने त्यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याच्याविरुद्ध नंतर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
तिसरा अपघात बुधवारी रात्री आठ वाजता ताडदेव येथील लाला लजपतराय मार्ग, उत्तर वाहिनीवर झाला. बुधवारी ताडदेव पोलिसांचे एक पथक परिसरात गस्त घालत होते, यावेळी या पथकाला हाजीअली ते लोटस जेट्टीकडे जाणार्या लाला लजपतराय मार्गावर एक अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे पोलीस पथक तिथे गेले होते. घटनास्थळी पोलिसांना एक महिला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे तिला पोलिसांनी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या महिलेची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अपघातानंतर पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.