गांजा तस्करीच्या आंतरराज्य टोळीचा एनसीबीकडून पर्दाफाश

तीन कोटीच्या 702 किलो गांजासह दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2026
मुंबई, – ओरिसा येथून आणलेला गांजा महाराष्ट्रातील विविध शहरात वितरण करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी प्रकाश एम. डी आणि पद्मलाल एन. एम या दोघांना या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्‍यांनी तीन कोटी रुपयांचा 702 किलो गांजासह एक ट्रक आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे. यापूर्वीही अशाच एका आंतरराज्य टोळीचा एनसीबीने पर्दाफाश करुन मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा जप्त केला आहे.

ओरिसा येथून मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पाठविण्यात आला असून हा गांजा महाराष्ट्रातील विविध शहरात वितरीत होणार असल्याची माहिती मुंबई युनिटच्या एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करुन तांत्रिक माहितीवरुन या पथकाने गोंदिया येथून एका ट्रकला थांबविले होते. या ट्रकची तपासणी केल्यानंतर डिटर्जंट, टूथपेस्ट आणि हेअर डायसारख्या किराणा मालाच्या आड गांजा लपविण्यात आल्याचे उघडकीस आले. याच ट्रकमधून या अधिकार्‍यांनी शंभरहून पाकिट जप्त केले असून या पाकिटमध्ये 702 किलो गांजा आढळून आला. त्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी आहे.

तपासात हा गांजा ओरिसा येथून महाराष्ट्रात पाठविण्यात आला होता. नागपूर, गोंदिया, पुणे आणि मुंबईतील काही गांजा तस्कारांना हा गांजा वितरीत होणार होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी गांजासह ट्रक ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांच्या चौकशीत ते दोघेही ओरिसा येथून नियमित गांजा घेऊन येत होते. ओरिसा बेकायदेशीर गांजा पुरवठ्याचे एक प्रमु, उगमस्थान म्हणून ओळखले जाते.

गांजा विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने महाराष्ट्रासह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. किरकोळ विके्रत्यांच्या मदतीने या गांजाची थेट ग्राहकांना विक्री केली जात होती. याबाबतची माहिती प्राप्त होताच गेल्या दोन महिन्यांपासून एनसीबीचे अधिकारी संबंधित माहितीची शहानिशा करत होते. अखेर या अधिकार्‍यांना या आंतरराज्य गांजा तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

11 एप्रिल 2026 रोजी याच पथकाने अशाच प्रकारे 210 किलो गांजाचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यावेळी वापरलेली गुन्ह्यांची पद्धत यावेळेस वापरण्यात आली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून या तस्करांनी किराणा मालाच्या वस्तूमध्ये गांजा लपवून आणला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page