टॉर्च मारला म्हणून ३८ वर्षांच्या चालकाची चाकूने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही मारेकर्यांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जून २०२६
मुंबई, – अंधारात मद्यप्राशन करताना अचानक टॉर्च मारला म्हणून झालेल्या वादातून रागाच्या भरात विलास साहेबराव हिवाळे या ३८ वर्षांच्या चालकाची तीनजणांच्या एका टोळीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजेश लोंढे, सिद्धार्थ लोंढे आणि सागर कापसीकर अशी या तिघांची नावे असून हत्येनंतर ते तिघेही पळून गेले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी २९ मेला मध्यरात्री अडीच ते पावणेतीनच्या सुमारास मानखुर्द येथील पीएमजीपी, गुरुकृपा हॉस्पिटलजवळील बेस्ट मैदान मेन गेटजवळ घडली. प्रल्हाद साहेबराव हिवाळे हा त्याच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठे नगर, सिद्धीविनायक चाळीत राहतो. सध्या तो फोर्ट येथील महाराष्ट्र नेव्हलमध्ये चालक म्हणून काम करतो. मृत विलास त्याचा लहान भाऊ असून तोदेखील चालक म्हणून काम करतो. अविवाहीत असलेला विलास याच परिसरातील साईकृपा चाळीत राहत होता.
३० मेला पहाटे चार वाजता त्याला त्याच्या पत्नीने विलासवर चाकू हल्ला झाला असून त्याला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समजली होती. या माहितीनंतर तो सायन हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला विलासने त्याच्यावर राजेश लोंढे, सिद्धार्थ लोंढे आणि सागर कापसीकर यांनी चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. २९ मेला जेवण करुन तो मध्यरात्रीबेस्ट मैदान मेन गेटजवळून जात होता. तिथेच त्याल राजेश, सिद्धार्थ आणि सागर हे तिघेही मद्यप्राशन करताना दिसले. सुरुवातीला अंधारात तिथे कोण आहे हे त्याला समजले नाही. त्यामुळे त्याने टॉर्च लावून तिथे कोण आहे याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने टॉर्च मारल्याने ते तिघेही प्रचंड संतापले.
याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून त्यांनी त्याला बेदम मारहाण करुन नंतर त्याच्यावर चाकूने वार केले होते. पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. उपचारादरम्यान त्याचा साडेबारा वाजता मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रल्हादच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेश लोंढे, सिद्धार्थ लोंढे आणि सागर कापसीकर याच्याविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा घडल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.