सासूच्या हत्येतील वॉण्टेड असलेल्या जावयाला तेरा वर्षांनी अटक
पत्नीसह मुलाला भेटू देत नाही म्हणून हत्या केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मिरा-भाईंदर-वसई-विरार, – कौटुंबिक वादातून रागाच्या भरात संजीदा मोहम्मद कयुम या ४० वर्षांच्या महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी जावयाला तेरा वर्षांनंतर तामिळनाडू येथून वसई गुन्हे शाखा क्रमांक दोनच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद अजमल मोहम्मद मंसुरी ऊर्फ पोफल असे या ४४ वर्षीय आरोपी जावयाचे नाव असून हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पत्नीसह मुलाला भेटू देत नाही म्हणून त्याने त्याची सासू संजीदा कयुमची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
साजिदा मोहम्मद कयुम ही महिला वसईतील देवीपाडा, गोखीवरे परिसरात राहत होती. तिचे मोहम्मद अजमलशी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर त्यांच्यात सतत कौटुंबिक कारणावरुन खटके उडत होते. त्यातून साजिदा ही मुलासह तिची आई संजीदा कयुमकडे आली होती. मोहम्मद अजमलकडून तिच्या मुलीचा मानसिक व शारीरिक शोषण होत असल्याने संजीदा कयुम त्याला त्याच्या पत्नीसह मुलाला भेटू देत नव्हती. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. २०१३ रोजी याच रागातून त्याने संजीदाची हत्या केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी साजिदाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती मोहम्मद अजमलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. तो मूळचा बिहारचा रहिवाशी होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम बिहारला गेली होती, मात्र तो त्याच्या गावी सापडला नाही. गेल्या तेरा वर्षांपासून त्याचा वालीव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद अजमल हा तामिळनाडू येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सहाय्यक फौजदार संजय नवले, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोलीस हवालदार प्रशांतकुमार ठाकूर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राहुल कर्पे, पोलीस अंमलदार अक्षय बांगर, सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण आदींचे एक पथक तामिळनाडू येथे पाठविण्यात आले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोहम्मद अजमल याला तामिळनाडूच्या तिरुवेल्लूर, मिंजुरी येथून संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने त्याची सासू संजीदा कयुमची हत्या केल्याची तसेच या हत्येच्या गुन्ह्यांत तो गेल्या तेरा वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे सांगितले. तपासात मोहम्मद अजमल हा मूळचा बिहारच्या मुंगेर, सफिया सरायचा रहिवाशी आहे. सध्या तो तामिळनाडूच्या रेड हिल्स परिसरात वास्तव्यास होता. अटकेच्या भीतीने तो तिथे गेल्या सहा वर्षांपासून कडीया काम करत होता.
कौटुंबिक वादातून संजीदा ही त्याची पत्नी आणि मुलाला भेट देत नव्हती. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने ही हत्या करुन पलायन केले होते. हत्येनंतर तो त्याच्या कोलकाता येथील बहिणीकडे गेला होता. तिथे चार ते पाच राहिल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होता. सहा वर्ष त्याने तामिळनाडू येथे कडीयाकाम केले. तेथून तो पंजाबला गेला. तिथे त्याने एक वर्ष काम केले.
चेन्नईमध्ये त्याने स्वतचे नाव पोफल सांगितले होते. चेन्नईनंतर तो पुन्हा तामिळनाडू येथे नोकरीसाठी आला होता, ही माहिती त्याच्या काही नातेवाईकांकडून प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मोहम्मद अजमलला तेरा वर्षांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी वसई येथे आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.