बोगस कामगार दाखवून कंपनीच्या ८८ लाखांवर डल्ला

कंपनीच्य वॉण्टेड अधिकार्‍याला सात महिन्यांनी अटक

0

अरुण सावरटकर
२ जुलै २०२६
मुंबई, – बोगस कामगार दाखवून एका खाजगी कंपनीच्या सुमारे ८८ लाखांवर डल्ला मारुन पळून गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍याला सात महिन्यानंतर दहिसर पोलिसांनी गजाआड केले. ओमकार आत्माराम धामसेकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ओमकारने २८ बोगस कामगार दाखवून या कामगारांना नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत ८८ लाखांचे पेमेंट केल्याचे बोगस दस्तावेज दाखवून या रक्कमेचा स्वतच्या फायद्यासाठी वापर केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

अरुण जगन्नाथ साठे हे अंधेरीतील मरोळ पोलीस कॅम्प, शिव कॉलनीतील रहिवाशी आहेत. सध्या ते दहिसर येथील तन्वी कॉम्प्लेक्स, युनिट सात परिसरात असलेल्या पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एचआरआयआर मॅनेजर म्हणून काम करतात. ही कंपनीत मुंबईसह देशभरात खाजगी कंपन्यांना कंत्राटी पद्धतीने कामगार पुरविण्याचे काम करते. याच कंपनीत १ सप्टेंबर २०२१ ते ७ जुलै २०२५ या कालावधीत ओमकार घामसेकर हा पे रोल एक्झीक्युटिव्ह म्हणून काम पाहत होता. कंपनीचे अधिकृत कामगार नसताना त्याने २८ बोगस कामगारांचे बोगस पेमेंट बिल बनवून त्यांना पेमेंट केले होते. अशा प्रकारे त्याने कंपनीत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला होता, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश कंपनीकडून अरुण साठे यांना देण्यात आले होते.

या आदेशानंतर त्यांनी चौकशी सुरु केली होती. तपासात त्यांच्या कंपनीकडून पुरविण्यात आलेल्या कामगाराबाबत क्लाएन्टच्या साईटवर कंपनीचे साईट सुपरवायझर काम पाहतात. त्यांचे पे रोल एक्सीक्युटिव्ह सॅलरी वॅकिंग बनवून कामगारांचे अटेंडन्स शीट संबंधित क्लाएन्टकडून ऍपूव्हलसाठी पाठविले जात होते. त्यानंतर त्याचे अंतिम बिलिंग करुन इन्व्हाईस त्यांच्या क्लाएन्टला पाठविल्यानंतर कंपनीकडून संबंधित कामगाराचे पगाराची रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जात होती. ही रक्कम जमा होताच या कामगारांना त्यांच्या पगाराचे वाटप केले जात होते. ओमकार धामसेकर याच्याकडे कंपनीच्या तेरा क्लाएन्ट कंपनीच्या सुमारे दोन हजार कामगारांचे पे रोल बिलिंगचे काम होते आणि तोच कामगारांचे पगार काढत होता.

कंपनीचा जुना तसेच व्यवस्थापनाचा विश्‍वासू अधिकारी असल्याने त्याला पे रोलला मंजूर करण्याची तसेच पेमेंट अकाऊंटला पाठविण्याचे अंतिम अधिकार प्राप्त होते. त्याचाच त्याने गैरफायदा घेतला होता. नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत त्याने अंधैरीतील क्लाएन्ट कंपनीकडून ऍप्रुव्हल आलेल्या खर्‍या डेटाची सॅलरी शिट पाठविण्याऐवजी कंपनीत कामगार नसलेल्या आणि कंपनीच्या कोणत्याही क्लाएन्ट कंपनीत काम न केलेल्या २८ बोगस कामगाराचे पे रोल सॅलरीमध्ये नाव नोंद केले होते. त्याचे बोगस सॅलरी शिट तयार करुन कंपनीत सादर करुन या बोगस कामगारांना ८८ लाख ३९ हजार १९५ रुपयांचे पेमेंट बिल मंजूर करुन या रक्कमेचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने अरुण साठे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ओमकार घामसेकर याने नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत कंपनीचे अधिकृत कामगार नसताना २८ बोगस कामगारांना ८८ लाख ३९ हजार १९५ रुपयांचे वेतन दिल्याचे दस्तावेज बनवून या पैशांचा स्वतच्या फायद्यासाठी वापर करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून सुमारे ८८ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या ओमकार घामसेकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, फसवणुकीच्या रक्कमेची त्याने कशा प्रकारे विल्हेवाट लावली, या पैशांतून त्याने काही प्रॉपटी घेतली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page