एचडीएफसी अर्गो हेल्थ पॉलिसीच्या नावाने ऑनलाईन गंडा

तीन बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करुन बाराजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२६
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून एचडीएफसी अर्गो हेल्थ पॉलिसीच्या नावाने अनेकांना ऑनलाईन गंडा घालणार्‍या एका टोळीचा गोवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी तीन बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकून बारा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर सर्व आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने मुंबईसह इतर राज्यातील अनेकांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

५७ वर्षाचे तक्रारदार विकास विश्‍वनाथ पोळ हे चेंेबूरच्या घाटला गाव परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांची एचडीएफसी अर्गो कंपनीची एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होती. ती २०२४ मध्ये बंद झाली. २३ जूनला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो एचडीएफसी अर्गो कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना त्यांच्या पॉलिसीची सुमारे दिड लाख रुपये नो क्लेम प्राप्त झाले आहे. बोनसची रक्कम मिळविण्यासाठी प्रोसेस करावी लागेल असे सांगून त्याने त्यांच्याकडून त्यांच्या क्रेडिट कार्डचा फोटो घेतला. त्यांच्या मोबाईलवर आलेले ओटीपी शेअर करण्यास प्रवृत्त करुनन त्यांच्या कार्डवरुन काही ऑनलाईन व्यवहार केले. अशा प्रकारे या ठगाने त्यांच्या कार्डचा गैरवापर करुन ३ लाख ४३ हजार ७४७ रुपयांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच विकास पोळ यांनी गोवंडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची ची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त रामराव ढिकळे यांनी गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत, पोलीस निरीक्षक हनुमंत क्षीरसागर, दयानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोल्हार, अजीत कंक, राहुल करंकाळ, माळवे, पोलीस हवालदार प्रकाश नागे, शंकर पवार, दशरथ राणे, संभाजी लोहेटे, विजय चव्हाण, सतीश साळुंखे, पोलीस शिपाई अरविंपद माळवे, निलेश भोर, समीर रेवाळे, महेश बोडरे, सोमनाथ आठरे, महिला पोलीस शिपाई कल्याणी पाफळे आदी तपास सुरु केला होता.

तपासादरम्यान पोलिसांना बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून ही फसवणुक होत असल्याचे लक्षात आले होते. या कॉल सेंटरची माहिती काढत असताना कुर्ला येथील कोहीनूर सिटी मॉल, गाळा क्रमांक जी/८४ मध्ये असलेल्या एम. के रिक्रूटमेंट मॅन पॉवर या कार्यालयात बोगस कॉल सुरु असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी सहाजणांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून फसवणुक केलेल्या ग्राहकांव्या क्रेडिट कार्डवरुन सोन्याचे शिक्के आणि इतर ऑनलाईन वस्तू खरेदी करुन पार्सल मागविले जात होते. त्यांच्या चौकशीतून इतर दोन कॉल सेंटरची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर या पथकाने असल्फा व्हिलेज येथील साई लिलावती निवास गाळा आणि कोहीनूर मॉल गाळा क्रमांक जी/२२ मध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी आणखीन सहाजणांना अटक केली.

या तिन्ही कारवाईत पोलिसांनी २९ संगणक, पाच लॅपटॉप, तीन राऊटर, पंधरा मोबाईल फोन, वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड, ग्राहकांना कसे बोलून क्रेडिट कार्डची माहिती घ्यायची याची स्क्रिप्ट, ऑनलाईन खरेदी केलेले २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे शिक्के आदी सतरा लाख अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंतच्या चौकशीत या टोळीने मुंबईसह इतर राज्यातील अनेक ग्राहकांना कॉल करुन त्यांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. आरेापींच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या काही टोळ्या मुंबई शहरात सक्रिय आहे. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीने इन्शुरन्स हेल्थ कंपनीतून बोलत असल्याचे सांगून इन्शुरन्स पॉलिसी बंद करण्याची तसेच त्यावरील परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपले बँक डिटेल्स, कार्ड डिटेल्स, ओटीपी मागितल्यास त्यांना ते देऊ नये. अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीची शंका आल्यास तात्काळ शासकीय हेल्प लाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page