कंपनीच्या बँक खात्यात अनधिकृत प्रवेश करुन ऑनलाईन फसवणुक
अठरा व्यवहाराद्वारे ७८ लाखांवर सायबर ठगांनी डल्ला मारल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जुलै २०२६
मुंबई, – परळ परिसरातील सोने तारण वितरण करणार्या खाजगी कंपनीच्या बँक खात्यात अनधिकृत प्रवेश करुन अज्ञात सायबर ठगांनी अठरा ऑनलाईन व्यवहार करुन सुमारे ७८ लाखांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुलैच्या तिसर्या आठवड्यात उघडकीस आलेल्या या घटनेने कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ही रक्कम जमा झालेल्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अमीत गोपाल मालपाणी हे कांजूरमार्ग येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. परळ परिसरात असलेल्या आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड या कंपनीत ते गेल्या सहा वर्षांपासून संचालक म्हणून काम पाहतात. त्यांची कंपनी नोंदणीकृत असून ती इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडियाची उपकंपनी आहे. कंपनीमार्फत त्यांच्या ग्राहकांना सोने तारण ठेवून कर्ज दिले जाते. कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी त्यांची कंपनी ओम्नीफिन नावाचे लोन मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरचा वापर करते. १३ जुलैला त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून १८ संशयास्पद ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारातून कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे ७८ लाख रुपये डेबीट झाले होते.
संबंधित व्यवहार कंपनी किंवा कंपनीच्या कुठल्याही अधिकार्यांकडून झाले नव्हते. हा प्रकार नंतर संबंधित अधिकार्याच्या निदर्शनास येताच त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला ही माहिती दिली होती. त्याची त्यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान अज्ञात सायबर ठगांनी कंपनीच्या बँक डिटेल्स आणि सिस्टीममध्ये छेडछाड, ओम्नीफिन सॉफ्टवेअर आणि त्रयस्थ एपीआय प्रणालीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश मिळविला होता. कंपनीने कुठलेही ओटीपी शेअर केले असताना या ठगांनी अठरा बोगस ऑनलाईन व्यवहार करुन कंपनीची सुमारे ७८ लाखांची आर्थिक फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच अमीत मालपाणी यांनी कंपनीच्या वतीने मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. ज्या अठरा बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या सर्व बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.