मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२६
मुंबई, – फ्री मूव्ही ऍपच्या जाहिरातीच्या माध्यातून एका व्यक्तीची अज्ञात सायबर ठगांनी ३ लाख ६६ हजाराची फसवणुक केल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फ्री मूव्ही ऍपची लिंक ओपन करणे तक्रारदारांना चांगलेच महागात पडले आहे.
सुधीर गोविंद मोरे हे विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहत असून ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ते त्यांच्या घरी होते, यावेळी ते सोशल मिडीयावर चित्रपटाचे रिल्स पाहत होते. त्या रिल्सच्या खाली फ्रि मूव्ही डाऊनलोड म्हणून एक लिंक दिली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. ही लिंक उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. मोबाईल चालू करण्याचा त्यांनी बरेच प्रयत्न केले, मात्र त्यांचा मोबाईल सुरु झाला नाही.
तीन दिवस उलटूनही मोबाईल सुरु न झाल्याने त्यांनी मोबाईल गॅलरीत जाऊन मोबाईल फॉरमेंट करुन सुरु केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील स्टेटमेंटची पाहणी केली असता त्यांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. दोन्ही बँक खात्याची पाहणी केल्यानंतर त्यांच्या खात्यातून ३ लाख ६६ हजार रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोन्ही बँक खाते बंद केले होते. त्यानंतर त्यांनी १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकासह पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मूव्हीची लिंक ओपन करणे सुधीर मोरे यांना चांगलेच महागात पडले आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.