मिल कामगाराच्या फ्लॅटसाठी घेतलेल्या ३९ लाखांचा अपहार
ओम साई इंटरप्रायजेसच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२६
मुंबई, – लोअर परेल येथील मिल कामगारांसाठी असलेल्या फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून फ्लॅटसाठी घेतलेल्या ३९ लाखांचा अपहार करुन एका महिलेची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आला आहे. याप्रकरणी अनिल अरुण माने या भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुक, शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अनिल हा ओम साई इंटरप्रायजेसचा मालक असून त्याने अशाच प्रकारे फ्लॅटच्या आमिषाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला प्रभादेवी येथे राहते. ऑक्टोबर २०२५ पासून तिला कॅन्सर झाल्याने ती सध्या तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिचे पती, सासरे आणि मुलगी हे परळ येथे राहतात. तिचे पती कुरिअर कंपनीत कामाला आहे तर ती ब्युटीपार्लरमध्ये काम करत होती. ब्युटीपार्लरच्या कामातून तिने तिच्या नवीन घरासाठी काही रक्कम जमा केली होती. याच दरम्यान तिची तिच्या एका मित्रामार्फत अनिल मानेशी ओळख झाली होती. त्याने तो लोअर परेल, वडाळा आदी परिसरात मिल कामगाराचे फ्लॅट खरेदी करुन त्याची विक्री करत असल्याचे सांगितले होते. दादरच्या नायगाव परिसरात त्याच्या मालकीचे ओम साई इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीचे कार्यालय असून याच कार्यालयातून त्याचे सर्व व्यवहार चालते.
१० जुलै २०२१ रोजी ती त्याच्या कार्यालयात फ्लॅटची चौकशीसाठी गेली होती. यावेळी त्याने तिला लोअर परेल येथील श्रीनिवास मिल कॉम्प्लेक्स इमारतीमधील ३०३ क्रमांकाचा फ्लॅट दाखवून त्याची किंमत ३८ लाख रुपये असल्याचे सांगितले. फ्लॅटचे कागदपत्रे त्याच्याकडून संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर तिच्या नावावर फ्लॅट करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे तिने त्याला दहा लाखांचे पेमेंट करुन फ्लॅटच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ती तिच्या कामात व्यस्त राहत होती, त्यामुळे अधूनमधून ती अनिल मानेकडे फ्लॅटविषयी चौकशी करत होती. २०२२ रोजी त्याने तिला फ्लॅटचे कागदपत्रे दाखविले होते, तिने फ्लॅटचा ताबा कधीपर्यंत मिळेल अशी विचारणा केल्यानंतर त्याने तिला सरकारने फ्लॅटवर तीन वर्षांचा स्टे आणला आहे. तो स्टे उठल्यानंतर तिच्या नावावर फ्लॅट करतो असे सांगितले.
काही दिवसांनी त्याने तिला श्रीनिवास मिलऐवजी बॉम्ब डाईंग मिल कामगारांचा एक फ्लॅट ४० लाखांमध्ये देतो असे सांगून तिच्यासोबत व्यवहार सुरु केला होता. याच दरम्यान तिला कॅन्सरचे निदान झाले होते, ती आजारी पडल्याने त्यांच्यातील व्यवहार थांबला होता. तरीही तिने त्याला फ्लॅटसाठी उर्वरित रक्कम दिली होती. २०२१ ते २०२६ या कालावधीत तिने मिल कामगाराच्या फ्लॅटसाठी अनिल माने याला टप्याटप्याने ३९ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
त्याने तिला धनादेश दिला, मात्र तो धनादेश बँकेत न वटता परत आला होता. पैसे देतो असे सांगूनही त्याने तिला पैसे दिले नाही. पैशांची मागणी केल्यानंतर तो तिला शिवीगाळ करुन तिचे पैसे परत करणार नाही तुला जे करायचे आहे ते कर अशी धमकी देऊ लागला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अनिल माने याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे, शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.