मानखुर्द- रे रोड येथील वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांवर हल्ला

दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत चार आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२६
मुंबई, – मानखुर्द आणि रे रोड येथील वेगवेगळ्या घटनेत क्षुल्लक वादातून दोन तरुणांवर चारजणांच्या टोळीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यात अजमेरी मोहम्मद कैफ राईन आणि मोहम्मद मुसदीर नौशाद अन्सारी हे दोन्ही तरुण जखमी झाले होते. त्यांच्यावर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी मानखुर्द आणि शिवडी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे. दिलीप प्रकाश दास, कैफ शकील अहमद खान, शेहबाज शकील अहमद खान आणि अल्ताफ कलिम मणियार अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अजमेरी मोहम्मद राईन हा २१ वर्षांचा तरुण मूळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवाशी आहे. सध्या तो शिवडीतील रे रोड, दारुखाना परिसरात भाड्याच्या रुममध्ये राहतो. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे दिलीप दास हा आला होता. त्याने त्याच्याकडे भाड्याची रक्कम मागितली होती, याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर दिलीपने अजमेरीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याया डोक्याला आणि चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती.

या हल्ल्यानंतर दिलीप हा घटनास्थळाहून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या अजमेरीला नंतर जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले. घडलेला प्रकार शिवडी पोलिसांना सांगून त्याने दिलीप दासविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या दिलीप दास याला पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या घटनेत बाईक धडक देणार्‍या तरुणाला जाब विचारला म्हणून तिघांनी मोहम्मद मुसदीर या १९ वर्षांच्या तरुणाला लाथ्याबुक्यासह चाकूने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. कैफ खान, शेहबाज खान आणि अल्ताफ मणियार अशी या तिघांची नावे आहेत. मोहम्मद मुसदीर हा मानखुर्द येथे राहत असून कचरा वेचण्याचे काम करतो. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता तो पीएमजीपी कॉलनी, साईबाबा मंदिर, के शॉपजवळ आला होता. यावेळी त्याच्या बाईकला कैफच्या बाईकची धडक लागली होती. त्यामुळे त्याने त्याला जाब विचारला असता कैफसह इतर दोघांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्याच्यावर वार केले होते. त्यात तो जखमी झाला होता.

यावेळी या तिघांनी तिथे असलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. सायन हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर मोहम्मद मुदसीरने घडलेला प्रकार मानखुर्द पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिघांनाही मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही गुन्ह्यांतील चारही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page