५४ लाखांचा अपहार करुन मानलेल्या बहिणीची फसवणुक

फसवणुकीप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जुलै २०२६
मुंबई, – विविध कारणासाठी घेतलेल्या सुमारे ५४ लाखांचा अपहार करुन मानलेल्या बहिणीचा तिच्याच भावासह वहिणीने फसवणुक केल्याचा प्रकार लोअर परेल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राजेंद्र महादेव जानवळकर आणि मयुरी राजेंद्र जानवळकर अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

विद्या शिवराम मेरवाडे ही तक्रारदार महिला वरळी येथे राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले असून तिचे तिच्या भावासोबत प्रॉपटीवरुन वाद होता. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित रुम विक्री करुन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. रुम विक्रीतून तिला ४१ लाख रुपये मिळाले होते. राजेंद्र जानवळकर हा तिच्या परिचित असून ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात चांगले कौटुुंबिक संबंध होते. तिला कोणाचाही आधार नव्हता, त्यामुळे ती राजेंद्रला तिचा भाऊ मानत होती. सुरुवातीच्या काही काळासाठी ती त्यांच्यासोबत राहत होती. राजेंद्र हा त्याची पत्नी मयुरी, मुलगी क्रिशा आणि आई हिराबाई यांच्यासोबत लोअर परेल येथील शंकरराव नरम पथ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर चाळीत राहत होता.

घराच्या विक्रीतून तिने साडेसहा लाख रुपये घरी ठेवले होते, ही माहिती राजेंद्र व मयुरीला माहित होती. काही दिवसांनी राजेंद्रने तिला मयुरीला ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरु करायचा आहे असे सांगून तिच्याकडे काही उसने पैशांची मागणी केली होती. ती त्याच्याच घरी राहत असल्याने तिने त्यांना पंधरा लाख रुपये दिले होते. त्यापैकी दहा लाख कॅश तर पाच लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्यांनी तिच्याकडे त्यांचे दागिने सोडविण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपये घेतले होते. तिचा ऍण्टॉप हिल येथे एक झोपडा होता, या झोपड्याची तिने पंधरा लाखांमध्ये विक्री केली होती. त्याचा संपूर्ण व्यवहार राजेंद्र यानेच केला होता. या व्यवहाराने राजेंद्र हा वेगवेगळे कारण सांगून तिच्याकडून पैशांची मागणी करत होता.

सख्ख्या भावाप्रमाणे मानत असल्याने ती त्याला आर्थिक मदत करत होती. काही दिवसांनी त्याने तिला रत्नागिरीच्या मंडणगढ येथे जागा घेऊन घर बांधण्याचा सल्ला दिला होता. तिथे आपण सर्वजण चांगले आयुष्य जगू असे सांगून तिचा विश्‍वास संपादन केला होता. त्याला तिने होकार दर्शविला होता. त्यानंतर त्याने एक २७ गुंठे जागा पाहिली होती. त्यासाठी त्याने तिच्याकडून टप्याटप्याने ३६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. ही जागा तो तिच्या नावावर करणार होता, मात्र सहा महिने उलटूनही त्याने त्याचे आश्‍वासन पाळले नाही. तिने जागेच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.

हा प्रकार तिला संशयास्पद वाटला होता. त्यामुळे तिने जागेचा व्यवहार रद्द करुन तिला तिचे पैसे परत करण्यास सांगितले. मात्र त्याने तिला पैसे परत केले नाही. याच पैशांवरुन त्यांच्यात भांडणे होऊ लागले होते. त्याच्या घरी राहणे नकोसे वाटू लागल्याने तिने वरळी येथे भाड्याने रुम घेतला होता. चौकशीनंतर तिला राजेंद्र आणि मयुरीने ब्युटीपार्लरसह गावी घर बांधण्यासाठी जागेसाठी, सोन्याचे दागिने सोडविण्यासाठी टप्याटप्याने ५३ लाख ८० हजार घेतले होते, वांरवार पैशांची मागणी करुनही त्याने पैसे परत केले नाही.

त्यांच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने ना. म जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजेंद्र जानवळकर आणि मयुरी जानवळकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page