मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जुलै २०२६
मुंबई, – जामिनावर बाहेर येताच पळून गेलेल्या एका साठ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीला २१ वर्षांनी गजाआड करण्यात खार पोलिसांना यश आले. जोसेफ अरुणदास जॉर्ज असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर २००५ साली रॉबरीच्या कलमांतर्गत कारवाई झाली होती. फेरअटक केल्यानंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
जोसेफविरुद्ध २००५ साली खार पोलिसांनी रॉबरीच्या एका गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन वांद्रे लोकल कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहत होता. तो पळून गेल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध सप्टेंबर २०२३ रोजी वांद्रे येथील लोकल कोर्टाने जाहीरनामा जारी केला होता. तसेच त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश खार पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या २१ वर्षांपासून तो फरार होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना जोसेफ हा माहीम येथील प्रगतीनगर परिसरात येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन वाघ, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, पवार, माने, शिपाई ठोंबरे यांनी जोसेफला माहीम येथून २१ वर्षांनी शिताफीने अटक केली. चौकशीत तोच रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याला दुपारी वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात आले होते.