गंमत म्हणून अमरनाथ यात्रेत बॉम्बस्फोटाचा मॅसेज पाठविणे अंगलट
मोबाईल लोकेशनवरुन कांदिवलीतील डिलीव्हरी बॉयला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२६
मुंबई, – गंमत म्हणून काश्मीर पोलिसांच्या कंट्रोल रुमला अमरनाथ यात्रेत बॉम्बस्फोटाचा मॅसेज पाठविणे एका २६ वर्षांच्या तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. बॉम्बस्फोटाचा मॅसेज पाठवून दहशतीचे वातावरण केल्याप्रकरणी शुभम सरजू यादव या डिलीव्हरी बॉयला समतानगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून या मोबाईलवरुन त्याने बॉम्बस्फोटाचा मॅसेज पाठविल्याचे उघडकीस आले आहे. मोबाईल लोकेशनवरुन त्याला पोलिसांनी काही तासांत गजाआड केले.
१२ जुलैला काश्मीर पोलिसांच्या पोलीस कंट्रोल रुमच्या व्हॉटअप क्रमांकावर एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने तो अमरनाथ यात्रेत बॉम्ब ठेवणार असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर काश्मीर कंट्रोल रुमचे पोलीस निरीक्षक अब्दुल आहद यांनी ही माहिती महाराज राज्याचे राज्य पोलीस आणि नंतर मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला माहिती दिली होती. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. तपासात तो कॉल कांदिवलीतील हनुमाननगर परिसरातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ही माहिती नतर समतानगर पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
ज्या मोबाईलवरुन धमकीचा मॅसेज पाठविण्यात आला होता, त्या मोबाईलची माहितीसह लोकेशन काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी मोबाईलचे लोकेशन हनुमान नगर येथे असल्याचे दिसून आले. ज्या व्यक्तीने संबंधित मॅसेज केला होता, त्या मॅसेजचे लोकेशनही हनुमाननगर येथे होते. हा धागा पकडून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तपासात तो मोबाईल शुभम यादव याचा होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी कांदिवलीतील हनुमाननगर, नरसीपाडा, लक्ष्मी चाळ, सुखशांती सोसायटीमधील त्याच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्यानेच तो मॅसेज पाठविल्याचे उघडकीस आले.
शुभम हा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून १२ जुलैला तो सोशल मिडीयावर काही रिल्स पाहत होता. यावेळी त्याला अमरनाथ यात्रेचा एक व्हिडीओ दिसला. त्यात एक व्यक्ती जॅकेट घातलेली होती. त्या रिलमध्ये काश्मीर पोलिसांच्या कंट्रोल रुमचा हेल्पलाईन क्रमांक होता. याच क्रमांकावर त्याने बॉम्बस्फोटाचा मॅसेज पाठविला होता. गंमत म्हणून त्याने तो मॅसेज पाठविला, मात्र ही गंमत त्याच्या चांगलीच अंगलट आली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.