मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२६
मुंबई, – पहिल्या पतीच्या संपर्कात राहून त्याच्याशी नियमित मोबाईलवर बोलत म्हणून रागाच्या भरात एका महिलेची तिच्याच पतीने दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. शबरुन नेसा रोजामियॉ अन्सारी असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी २० वर्षांचा आरोपी पती सेराज भिखारी अन्सारी याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी सकाळी दहा वाजता जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, गुलशननगर, महाराष्ट्र बेकरीजवळील रोस्वाल्ट इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या दुसर्या मजल्यावर सेराज हा त्याची पत्नी शबरुनसोबत राहत होता. शबरुनचा सेराजचा दुसरा विवाह झाला असून तिचा पहिले लग्न आरिफ अन्सारीसोबत झाले होते. सेराजशी लग्न झाल्यानंतर शबरुन ही तिचा पहिला पती आरिफसोबत मोबाईलवरुन संपर्कात होती. याच कारणावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. रविवारी सकाळी दहा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.
त्यातून रागाच्या भरात सेराजने शबरुनची दोरीने गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शबरुनला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात तिची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.
या घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी पतीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सेराज अन्सारीला सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच शबरुनची हत्या केल्याची कबुली दिली. तिच्या पहिल्या पतीसोबत मोबाईल बोलणे आणि त्याच्या संपर्कात राहणे त्याला पसंद नव्हते. त्यातून झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.