नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा वॉण्टेड भामटा गजाआड

केंद्र सकारी नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२६
मुंबई, – नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या एका वॉण्टेड भामट्याला अखेर आठ महिन्यानंतर एमएचबी पोलिसांनी अटक केली. सचिन कृष्णा सावंत असे या भामट्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत स्वतला आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या निलेश काशिराम राठोडला पोलिसांनी अटक केली होती. निलेशने सचिन सावंत आणि करण सिंधानिया यांच्या मदतीने अनेक बेरोजगार तरुणांना केंद्रात विविध पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून, नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले.

प्रकाश नरेश उदेशी हे इस्टेट ब्रोकर असून सध्या दहिसर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे दहिसर येथे एक कार्यालय आहे. याच कार्यालयात सचिन सावंत येत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याने त्यांना निलेशविषयी माहिती सांगताना तो दिल्लीचा आयपीएस अधिकारी असून त्याची गृहखात्यात चांगली ओळख असल्याचे सांगितले होते. तो त्यांच्या मुलाला सेंट्रल एक्साईज विभागात नोकरी मिळवून देईल असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. सचिनच्या सांगण्यावरुन त्याने त्याला निलेशची भेट घडवून आणण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांची सांताक्रुज येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती.

या हॉटेलमध्ये सचिनसोबत निलेश व करण सिंघानिया असे दोघेजण आले होते. त्यांनी त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन नोकरीसाठी किमान दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मुलाला सरकारी नोकरी मिळत असल्याने त्यांनी दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आठ लाख रुपये दिले. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांच्या मुलाला मेडीकलसाठी पाठवून ओरिसा येथील सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांना नोकरीचे पत्र दिले होते. मात्र ते पत्र बोगस असल्याचे नंतर त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.

मात्र त्यांनी त्यांना आठ लाख रुपये परत केले नाही किंवा त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी दिली नव्हती. फसवणुकीच्या उद्देशाने या तिघांनी नोकरीचे गाजर दाखवून गंडा घातला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी तिन्ही आरोपींविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निलेश राठोड, सचिन सावंत आणि करण सिंधानिया या तिघांविरुद्ध नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन नोकरीसाठी घेतलेल्या आठ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात निलेश राठोडला पोलिसांनी अटक केली.

तपासात तो बोगस आयपीएस अधिकारी असल्याचे उघडकीस आले होते. अनेकांना आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून तो त्याची गृहविभागात ओळख आहे. वेगवेगळ्या केंद्र सरकारी विभागात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालत होता. त्यासाठी त्याला सचिन आणि करण मदत करत होते. या दोघांनी अनेकांची ओळख निलेशसोबत करुन दिली होती. गेल्या काही वर्षांत या टोळीने अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. निलेशच्या अटकेनंतर इतर दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वी या कटातील अन्य एक मुख्य आरोपी सचिन सावंत याला पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला आठ महिन्यानंतर गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यांत करण सिंधानिया याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याच्या अटकेने त्यांनी मुंबईसह इतर शहरात आतापर्यंत किती बेरोजगार तरुणांची किती रुपयांना नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली आहे याचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page