घरकाम करताना आठ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

दहा वर्षांपासून कामाला असलेल्या नोकराला मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – घरकाम करताना कपाटातील सुमारे आठ लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांवर नोकरानेच डल्ला मारल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राहुल कुमार सफी नावाच्या नोकराला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. राहुल हा मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवाशी असून तो गेल्या दहा वर्षांपासून तक्रारदार व्यावसायिकाकडे कामाला होता. त्याच्याकडून चोरीचे बहुतांश सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

आदित्य निर्मल हे व्यावसायिक असून त्यांचा शेअरमार्केटचा व्ववसाय आहे. सध्या ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत अंधेरीतील जे. पी रोड, चार बंगला, पार्थेलॉनन अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक बी/१२०३ मध्ये राहतात. त्यांच्या दोन्ही मुली दिल्ली आणि पुणे येथे शिक्षण घेतात. त्यांच्याकडे राहुल हा गेल्या दहा वर्षांपासून तर आशा ही सहा महिन्यांपासून घरकाम करते. सोमवारी २० जुलैला ते त्यांच्या पत्नीसोबत नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावर निघून गेले होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांची आई किचनमध्ये आला असता तिला राहुलकडे एक सोन्याची बांगडी दिसून आली. तिने बांगडीविषयी विचारणा केल्यानंतर राहुलने तिला टाळण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कपाटातील सर्व सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला तिथे काही दागिने गहाळ असल्याचे दिसून आले. सायंकाळी सहा वाजता आदित्य निर्मल हे घरी आले असता त्यांच्या आईने त्यांना दिवसभरातील घडलेला प्रकार सांगितला. रात्री राहुल हा कामासाठी बाहेर गेला होता, त्यामुळे त्यांनी सकाळी त्याच्याकडे विचारणा करु असे सांगतले. दुसर्‍या दिवशी त्यांनी राहुलला नास्ता बनविण्यास सांगण्यासाठी गेले होते, मात्र घरी राहुल कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना कपाटातून विविध सोन्याचे दागिने असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यात साठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, पंधरा ग्रॅमची सोन्याची अंगठी, अकरा ग्रॅमची सोन्याची इअररिंग, तीस ग्रॅमचे अनुक्रमे कंबरपट्टा, नेकलेस सेट, पंधरा ग्रॅमचे सोन्याचे कॉईन, पंचवीव आणि दहा ग्रॅमचे डायमंड पेंडेट असलेली दोन चैन आदींचा समावेश आहे.

प्राथमिक तपासात १२ जुलै ते २० जुलै या कालावधीत त्यांच्या घरी गेल्या दहा वर्षांपासून काम करणार्‍या राहुलने ही चोरी केली होती. या चोरीनंतर तो घरातून निघून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांचा नोकर राहुल सफीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. राहुल हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोीहम सुरु असताना काही तासांत पोलिसांनी राहुलला शिताफीने अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे बहुतांश सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page