दुबईहून पाठविलेल्या साडेचौदा लाखांचा मुद्देमालाचा अपहार

४१ वर्षांच्या आरोपी मैत्रिणीविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – दुबईहून पतीने पाठविलेल्या सुमारे साडेचौदा लाखांच्या मुद्देमालाचा मैत्रिणीनेच अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४१ वर्षांच्या महजबीन मोहम्मद इम्रान नावाच्या आरोपी मैत्रिणीविरुद्ध सहार पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. दुबईहून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर महजबीन ही तिच्या ट्रॉम्बे येथील घरी न गेल्याने तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

३२ वर्षांची तक्रारदार महिला कौसरी उमर राजपूत ही रायगडच्या खोपोली परिसरात राहते. तिचा पती उमर हे कांदा-लसूनचे व्यावसायिक असून ते व्यवसायानिमित्त सध्या दुबईत राहतात. मेहजबीन ही तिच्या परिचित असून ती सध्या ट्रॉम्बे परिसरात राहते. त्या दोघीही एकमेकांना गेल्या सात वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे तिला तिचे पती दुबईत असल्याची माहिती होती. २६ जूनला मेहजबीन ही दुबईला गेली होती. यावेळी तिने उमर यांना कॉल केला होता. त्यांनी तिच्या राहण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. उमरने कौसरीसाठी सोने, लॅपटॉप, आयफोन आणि चॉकलेट खरेदी केले होते. त्यांना दुबईला आणखीन काही वेळ लागणार असल्याने त्यांनी तिला कॉल करुन महजबीनकडून ते सामान पाठवत असल्याचे सांगून तिला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते सामान घेण्यास सांगितले होते.

३० जूनला महजबीन ही दुबईहून मुंबईत येणार होती, त्यामुळे कौसरी राजपूत ही आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान आणण्यासाठी गेली होती. आंतरराष्ट्रीय विमानतळावर ती महजबीनची वाट पाहत होती, मात्र बराच वेळ होऊन मेहजबीन तिथे आली नाही. दुबईहून आलेले जवळपास सर्व प्रवास विमानतळाबाहेर आले होते, मात्र मेहजबीन न दिसल्याने तिने तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने तिला प्रतिसाद दिला नाही. प्रत्येक वेळेस ती तिचा कॉल कट करत होती. मेहजबीनसोबत तिच्या परिचित अब्दुल्लना मोईद्दीन हे दुबई-मुंबई विमान प्रवासात होते. त्यांनी तिच्या पतीने मेहजबीनला काही सामान दिल्याचे सांगून ती आंतरराष्ट्रीय विमानतळाहून अचानक गायब झाल्याचे सांगितले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच कौसरी राजपूत तिच्या ट्रॉम्बे येथील चिताकॅम्प, सेक्टर एस-वनमधील घरी गेली होती. यावेळी तिच्या घरी तिची बहिण आणि मुलगा होता. या दोघांकडे विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते. मेहजबीनने तिच्या पतीने दिलेल्या साडेचौदा लाखांचा मुद्देमालाचा अपहार केल्याचे लक्षात येताच तिने घडलेला प्रकार ट्रॉम्बे पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडल्याने त्याचा तपास नंतर सहार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

गुन्ह्यांचे कागदपत्र हाती येताच पोलिसांनी मेहजबीनचा शोध सुरु केला आहे. अपहार केलेल्या सामानामध्ये साडेसहा लाखांचे ५० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, साडेसहा लाखांची सोन्याची चैन, डेल कंपनीचा लॅपटॉप, १ लाख ९२ हजाराचे दोन आयफोन फोन, २५ हजाराचे फुलटूस गॅलेक्स, चोको चिप्स कंपनीचे चॉकलेट आदींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page